योगेश पांडे, नागपूर : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले आहे. विश्व हिंदू परिषदेने आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांनी केलेले वक्तव्य हे एका षडयंत्राचाच भाग असून त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्याला मौन स्वीकृती आहे. पवार यांनी या प्रकरणात तातडीने माफी मागण्याची विहिंपच्या महाराष्ट्र व गोवा क्षेत्राचे मंत्री गोविंद शेंडे यांनी मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे हे मुखर्तापूर्ण व जाणुनबुजून केलेले वक्तव्य आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत ते बोलले. पवारांनी या वक्तव्याला विरोध केला नाही व याचाच अर्थ त्यांचीदेखील याला मौन स्वीकृती आहे. आव्हाड यांचे हे वक्तव्य भगवान राम, हिंदू धर्मीय व सनातन संस्कृतीचा अपमान आहे. लोकांमध्ये त्यांच्याविरोधात संताप आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेत असून त्या दिशेने आम्ही पावले उचलू. तसेच पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील नोंदविणार आहोत. शरद पवार यांनी या विषयावर स्वत:ची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या समोर वक्तव्य होत असतानाच त्यांनी थांबवायला हवे होते किंवा नंतर स्पष्टीकरण द्यायला हवे होते.
शरद पवार यांनीदेखील हिंदू समाजाची माफी मागावी. तसेच आव्हाड यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यांना पक्षातून बाहेर काढावे, असे प्रतिपादन गोविंद शेंडे यांनी केले. २२ जानेवारी रोजी अयोध्येत नवनिर्मित राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या या नेत्यांना पचलेली नाही. देशभरात हिंदुत्वाचा हुंकार असताना हा खोडसाळपणा करण्यात येत आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. समाज राममय झाला असून समाजावर अशा वक्तव्याचा काहीही परिणाम होणार नाही. राम बहुजन किंवा हिंदूंचा नसून देशातील प्रत्येक व्यक्तीचा आहे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंची आव्हाडांच्या मताशी सहमती का?
विहिंपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी प्रखर भूमिका घेतली होती. मात्र आता ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, त्या आव्हाडांच्या या मताशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का असा सवाल शेंडे यांनी उपस्थित केला.