पीएचडी करून काय दिवे लावणार? वक्तव्याने वादाची ठिणगी; अखेर अजित पवारांची सारवासारव, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:14 PM2023-12-14T13:14:09+5:302023-12-14T13:16:42+5:30

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले होते. तसंच विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

ncp leader Ajit Pawar reaction on controversy over Statement about PhD students | पीएचडी करून काय दिवे लावणार? वक्तव्याने वादाची ठिणगी; अखेर अजित पवारांची सारवासारव, म्हणाले...

पीएचडी करून काय दिवे लावणार? वक्तव्याने वादाची ठिणगी; अखेर अजित पवारांची सारवासारव, म्हणाले...

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे मुद्दे गाजत आहेत. तसंच अधिवेशनात काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यानेही प्रचंड गदारोळ झाला. "पीएचडी करून तरुण काय दिवे लावणार आहेत," असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

"पीएचडीबाबत माझा तोंडातून 'काय दिवा लावला जाणार' असा शब्द गेला . त्याचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली आहे," असं अजित पवार यांनी आज म्हटलं. तसंच "अनेकांनी राजकीय नेत्यांवर पीएचडी केली. पीएचडी करण्याबद्दल माझं दुमत नाही. पीएचडीबाबत  विषय निवडीसाठी समिती नेमायला हवी. अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल," असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

विरोधकांनी केली होती घणाघाती टीका

अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आक्रमक शब्दांत टीका केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटलं होतं की, "राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उच्च शिक्षणाबद्दल हे वक्तव्य म्हणजे हा भाजपाप्रणित सरकारचा माज दर्शवतो. या माजुरड्या सरकारचा निषेध," अशा शब्दांत पटोले यांनी आपला संताप व्यक्त केला होता. 

दरम्यान, अजित पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ह कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासमोर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. अखेर आता अजित पवार यांनी याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
 

Web Title: ncp leader Ajit Pawar reaction on controversy over Statement about PhD students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.