Ajit Pawar Vs Jayant Patil ( Marathi News ) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अधिवेशन कालावधी आणखी वाढवायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तडकाफडकी उठले आणि त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत जयंत पाटील यांना फटकारलं. इथे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा, असं अजित पवार हे जयंत पाटलांना उद्देशनू म्हणाले.
विदर्भात अधिवेशन होत असताना विरोधी पक्षाने विदर्भाचा विषय मांडला नसल्याचा आम्हाला खेद वाटतो, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी अधिवेशन कालावधीचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं की, "विदर्भाचा विषय सत्ताधारी पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. 'ऑर्डर ऑफ द डे'मध्ये आजही तो विषय आहे आणि त्यावर चर्चा होणार आहे म्हणून आम्ही सगळेजण बसून आहोत. मात्र दहा दिवस अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव व या बाजूने एक प्रस्ताव किंवा इथून दोन प्रस्ताव आणि तिकडून एक प्रस्ताव असं तुम्ही करत आहात. त्यापेक्षा अधिवेशन एक महिन्याचं घ्यावं, अशी आमची मागणी होती," असं पाटील म्हणाले.
अधिवेशन कालावधीवरून जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करताच उत्तर देण्यासाठी अजित पवार उठू लागले. त्यावर जयंत पाटील यांनी आधी कोणी बोलायचं हे बसून ठरवा, असं म्हटलं. त्यानंतर आक्रमक झालेले अजित पवार जयंत पाटलांना फटकारत म्हणाले की, " बसून ठरवण्याची गरज नाही. आमचं अण्डरस्टँडिंग खूप चांगलं आहे. कधी कोणी बोलायचं हे कळतं आम्हाला. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. तेव्हा विरोधी पक्षाला कळालं होतं की अधिवेशन उद्या संपणार आहे. त्यावेळीच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सांगायला पाहिजे होतं की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. इथे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा," अशा शब्दांत अजित पवारांनी पाटलांना खडसावलं.
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर जाहीर सभांमधून दोन्ही गटाचे नेते अनेकदा एकमेकांवर निशाणा साधताना पाहायला मिळत होते. या नेत्यांमधील संघर्ष आता थेट सभागृहातही पोहोचल्याचं आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये झालेल्या खडाजंगीतून दिसून आलं.