राष्ट्रवादीच्या नेत्यांची नागपुरात वर्दळ, काँग्रेसला हात दाखविण्याचा बेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 03:32 PM2022-05-02T15:32:58+5:302022-05-02T17:33:49+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने प्रत्येक प्रभागात आपली ताकद वाढविण्याचे नियोजन केले आहे.
नागपूर : जेमतेम एक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर महापालिकेची आगामी निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांनी नागपूरवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसकडून आघाडीच्या प्रस्तावावर मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे राष्ट्रवादीचे नेते दुखावले असून, त्यामुळे त्यांनी आता काँग्रेसलाच हात दाखविण्याचा बेत आखला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने प्रत्येक प्रभागात आपली ताकद वाढविण्याचे नियोजन केले आहे. पक्षाचे नागपूर प्रभारी प्रफुल्ल पटेल प्रत्येक महिन्यात किमान दोन बैठका व कार्यक्रम घेत आहेत. एवढेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागपूरकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या प्रत्येक भेटीत शहराच्या कुठला ना कुठल्या प्रभागात इच्छुक उमेदवाराचे जनसंपर्क कार्यालय सुरू करून त्यांना कामाला लावले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्यांनी ज्या कार्यकर्त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले ते काम करीत आहे की नाही, याचा आढावा संबंधित नेते स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेत आहेत.
सक्षम लोकांना पक्षात आणा
- समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सक्षम लोकांना हेरा. त्यांची भेट घ्या. त्यांना नेत्यांचे निरोप सांगा व पक्षात प्रवेश घेण्याची विनंती करा, अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार भेटीगाठी सुरू आहेत. लवकरच काही मोठी नावे राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसतील, असा दावा केला जात आहे.
शिवसेनेबाबत सकारात्मक
- राष्ट्रवादीचे नेते नागपुरात शिवसेनेशी आघाडी करण्याबाबत सकारात्मक आहेत. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेसाठी आघाडी करण्याबाबतचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. स्थानिक नेत्यांनी शिवसेनेशी हात मिळवणी करण्याचा प्राथमिक प्रस्ताव नेत्यांपुढे मांडला असून, त्याला संमती मिळाल्याची माहिती आहे.