नागपूर - संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी त्यांचा वेश परिधान करत अटकेसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. विशेष म्हणजे त्यांनी भिडेंचे आंबे विकत निषेधही केला. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी त्यांचा वेश परिधान केला आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांचे आंबे विकण्याचे आंदोलन केले. त्यांचे आंदोलन हे पहिल्याच दिवशीचे वेगळे आकर्षण ठरले.पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आजपासून सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकपणा दाखवत भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी अनोखे आंदोलन केले. आमदार प्रकाश गजभिये यांनी चक्क भाजप-सेना मंत्री आणि आमदारांना भिडेंचे आंबे देण्याचा प्रयत्न केला. संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी आमदार प्रकाश गजभिये यांच्यासमवेत आमदार विद्या चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनात सहभागी झाले.
संभाजी भिडेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभियेंचे अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 1:35 PM