नागपूर : भाजपचा वरचष्मा असलेल्या नागपूर महापालिकेने ओसीडब्ल्यूचे ९२ कोटी रुपये वनटाइम सेटलमेंटच्या नावाखाली माफ केले. तर सामान्य नागरिकांना पाण्याचे बिल वाढवून पाठविले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेला वाढीव पाठविलेले बिल ओसीडब्ल्यूच्या कार्यालयापुढे जाळून आंदोलन केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तांडापेठ नाईक तलाव, मासूरकर चौक, बारसेनगर, पाचपावली, लेंडी तलाव येथील अनेक भागात ओसीडब्लूच्या कर्मचाऱ्यांनी मीटरमध्ये अडकलेली धूळ असल्यास ते साफ न करता ॲव्हरेज रिडींगच्या नावाखाली रिडींग वाढवून चुकीचे बिल पाठवले आहे.
लोकांनी ओसीडब्लू कार्यालयात जाब विचारल्यास बिल कमी न करता पूर्ण बिल भरावेच लागेल, कुठलीही कपात करून मिळत नाही, असे बजावले जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय रहिवासी राहत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले बिल भरू शकत नाहीत. त्यामुळे लोकांना आलेले वाढीव बिल माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी रिजवान अन्सारी, प्रमोद गारोडी, संकेत नागपूरकर, आदित्य केदारपवार, राहुल पराते, नंदू माटे, भारती गायधने, शेखर बेंडेकर, पुष्पा झिलपे, संदीप मेंढे, दिलीप सारवा, सदाशिव शेटे उपस्थित होते