काँग्रेसच्या ‘स्वबळा’वर राष्ट्रवादी-सेना नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 11:15 AM2021-12-24T11:15:54+5:302021-12-24T11:26:59+5:30

भाजप राज्यात मजबूत आहे. अशा परिस्थितीत एकत्र येत सामना करणे काळाची गरज आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी घेतलेली स्वबळाची भूमिका भाजपसाठी पोषक ठरू शकते.

NCP Shiv Sena angry over Congress 'self-reliance' behavior | काँग्रेसच्या ‘स्वबळा’वर राष्ट्रवादी-सेना नाराज

काँग्रेसच्या ‘स्वबळा’वर राष्ट्रवादी-सेना नाराज

Next
ठळक मुद्देविदर्भाबाहेर स्वबळ टिकणार का? भाजपला फायदा होण्याचा धोका

नागपूर :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या भूमिकेची अंमलबजावणी करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढताना दिसत आहे. मात्र, काँग्रेसच्या या ‘एकला चलो रे’च्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना कमालीची दुखावली आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आमच्यासमोर हात पसरायचे व स्थानिक पातळीवर आम्हालाच पाय हाणायचे ही काँग्रेसची भूमिका योग्य नाही, अशी नाराजी दोन्ही पक्षाचे नेते व्यक्त करीत आहेत. काँग्रेसने वेळीच भूमिका बदलली नाही, तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येण्यास दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी संमती दिली असल्याची माहिती आहे.

भाजप राज्यात मजबूत आहे. अशा परिस्थितीत एकत्र येत सामना करणे काळाची गरज आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी घेतलेली स्वबळाची भूमिका भाजपसाठी पोषक ठरू शकते. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या नेत्याचा रिंगणातील कार्यकर्ता पराभूत कसा होईल, यातच दुसरा नेता शक्ती गमावतो. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी म्हणून तीन पक्षांची ताकद उभी राहिली तर गटबाजीला खतपाणी घालणाऱ्यांवरही दबाव निर्माण होईल व याचा काँग्रेसला पक्ष म्हणून फायदा होईल. भंडारा- गोंदियाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी लेखण्याचे फळ काँग्रेसला भेटेल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केला आहे.

एकला चलोच्या नादात एकटे पडू नये

पटोले यांचे स्वबळ फक्त विदर्भात टीकू शकते. मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस एकटी तग धरणार का, हा खरा प्रश्न आहे. या भागात काँग्रेसचे पूर्वी सारखे प्रस्थ राहिलेले नाही. अशात राष्ट्रवादी व शिवसेनेला सोबत घेतले नाही तर पुन्हा काँग्रेस चवथ्या क्रमांकावर फेकली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकला चलोच्या नादात एकटे पडू नये म्हणजे पावलं, अशी प्रतिक्रिया विदर्भाबाहेरील एका काँग्रेस नेत्याने व्यक्त केली.

नागपुरात राष्ट्रवादी-सेना युतीचा प्रयोग

काँग्रेसची आडमुठी भूमिका कायम राहिली तर स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येण्याची तयारी चालविली आहे. नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत युतीचा हा प्रयोग करण्यासाठी प्राथमिक बैठकाही झाल्या आहेत. सूत्रानुसार दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी या प्रयोगाला संमती दिली आहे.

Web Title: NCP Shiv Sena angry over Congress 'self-reliance' behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.