नागपूर : महापालिकेतील तीन सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धती करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात जनमत उभे करण्याची तयार राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. या निर्णयाविरोधात जनतेला सोबत घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नावे मुंबई राजभावनावर पत्रांचा पाऊस पाडण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी उपमहापौर शेखर सावरबंधे, रमण ठवकर, सतीश इटकेलवार, अफजल फारूक आदींनी पत्रकार परिषद घेत यासंबंधीची घोषणा केली. राज्यपालांनी व निवडणुक आयोगांनी या गंभीर विषयाची दखल घेण्याची मागणी केली. पेठे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मे तसेच जुलै महिण्यात दोन वेळा राज्य निवडणुक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका १५ दिवसात जाहीर करा असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार तिन सदस्यीय प्रभाग निहाय निवडणुकीची संपूर्ण ऑगस्टला ओ.बी.सी आरक्षणाचे राजपत्र प्रसिध्द होणार होते. तरी देखील दोन दिवसांपूर्वी फक्त दोन लोकांच्या कॅबीनेट ने चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणुक घेण्याचा तुघलकी फरमान काढले आणि त्यांच्या या निर्णयाने निवडणुका अनिश्चीत काळाकरीता पुढे ढकल्या गेल्या.
राज्य घटनेतील अनुच्छेद २४३-ई आणी २४३ -यु आणी महाराष्ट्र महापालिका कायदयातील कलम ४५२ अ(२) तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधित कायदयातील इतर तरतुदी नुसार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुका विनाविलंब झाल्याच पाहीजे असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. ५ ऑगस्ट ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे लवकर निवडणुका घेणे बंधनकारक होते पण आमची पुन्हा सत्ता येणार नाही या भितीने सर्वोच्च न्यायालयाची आदेशाची पायमल्ली या सरकारने केली, असा आरोप पेठे यांनी केला.