नागपूर : वेकोलित नोकरी करत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून बॅंकेची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला आहे. यासंदर्भातील मास्टरमाइंड असलेला बॅंकेचा रिकव्हरी एजंट हा चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असल्याचे आढळून आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या इतवारी मस्कासाथ येथील बॅंकेत हा प्रकार घडला. गुलाम अशरफी ऊर्फ प्यारे अशरफी (४० वर्षे, रा. यादवनगर, बिनाकी, मंगळवारी) हा बॅंकेचा रिकव्हरी एजंट म्हणून काम करतो. लोकेश सर्पे (३५, बिनाकी, मंगळवारी) व इम्रान खान उस्मान खान (३५, बिनाकी, मंगळवारी) यांना अशरफी याच्या मालकीची स्थावर मालमत्ता विकत आहे, असे दाखविण्यात आले. या व्यवहारासाठी कर्जासाठी अर्ज करण्यात आला व दोघेही वेकोलि येथे नोकरीस आहे, असे सांगून त्यांचे बोगस ओळखपत्र, सॅलरी स्लिप, फॉर्म-१६, पगार बॅंकेत जमा होत असल्याचे विवरण बॅंकेत सादर करण्यात आले. नियमानुसार बॅंकेतून या गोष्टींची पडताळणी होती. याची जबाबदारी थर्ड पार्टी असलेल्या ॲस्ट्युट कॉर्पोरेट सर्व्हिस प्रा. लि.कडे होती. तेथील कर्मचाऱ्यांशीदेखील आरोपींनी संगनमत केले व त्यांनी बॅंकेत ‘ऑल इज वेल’चा सकारात्मक अहवाल सादर केला. बॅंकेने लोकेश व इम्रान यांना अनुक्रमे ८९ लाख व एक कोटींचे कर्ज मंजूर केले. कागदपत्रांची योग्य पडताळणी केली असता ही बाब समोर आली. यानंतर बॅंकेचे व्यवस्थापक संकेत प्रसाद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात तपास केला असता गुलाम अशरफी ऊर्फ प्यारे अशरफी हा मुख्य आरोपी असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याला यशोधरानगरातून ताब्यात घेतले व लकडगंज पोलीस पुढील तपास करत आहेत. त्याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गजानन राजमाने, सहा. पोलीस आयुक्त संजय सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सुनील चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, मुकुंद वारे यांनी ही कारवाई केली.
जप्त वाहने खरेदी करण्याचादेखील गोरखधंदा
गुलाम अशरफीने त्याच्या ‘यंग फोर्स’ या संघटनेच्या माध्यमातून शेकडो गरीब टॅक्सीमालक तसेच इतर वाहनमालकांची फसवणूक केल्याची बाबदेखील समोर आली आहे. तो गरीब वाहनचालकांना बँकेतून कर्ज घेऊन महागडे वाहन खरेदी करायला लावायचा. जेव्हा ते बँकेचे हस्ते भरण्यास अपयशी ठरायचे तेव्हा सुरुवातीला त्यांना बँकेच्या वसुली पथकाच्या कारवाईपासून संरक्षण द्यायचा आणि नंतर स्वतः बँकेसोबत सेटिंग करून जप्त झालेले वाहन लिलावात कमी किमतीत खरेदी करायचा. या ‘मोडस ऑपरेंडी’ने त्याने अनेक ट्रक्स, जेसीबी, एसयूव्हीसारखी महागडी वाहने स्वत:च्या नावावर करून घेतल्याची बाब उघड झाली आहे.
बऱ्याच लोकांच्या फसवणुकीची शक्यता
मुख्य आरोपीने अशा पद्धतीने बऱ्याच जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्याच्या विरुद्ध बरेच तक्रारदार अर्ज घेऊन येत आहेत. जर कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या नावे त्याने कर्ज घेतले असल्यास दबावात न येता असा व्यक्तींनी समोर येऊन पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.
राष्ट्रवादीत झाला होता सक्रिय
गुलाम अशरफीने काही महिन्यांअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांना भेटायला तो स्थानिक नेत्यांसोबत जायचा. याशिवाय ‘सोशल मीडिया’वरदेखील त्याने स्वत:चे राजकारणी म्हणून प्रमोशन सुरू केले होते.