नागपूर : टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेले बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांना पार्थ दासगुप्ता व अर्णव गोस्वामी यांच्यासोबत व्हॉट्सॲपवर झालेल्या चॅटिंगच्या पोस्ट सोशल मीडियावर सगळीकडे झळकत आहेत. स्वतःच्या स्वार्थाकरिता देशाचे हित धोक्यात आणणाऱ्या अशा देशविघातक कृती करणाऱ्यांविरुद्ध सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने सक्करदरा चौकात निदर्शने केली. सोबतच अर्णब गोस्वमी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. बालाकोट एअर स्ट्राईक होण्याच्या तीन दिवस आधी पार्थ दासगुप्ता यांच्यासोबत झालेल्या चॅटिंगमध्ये गोस्वामी यांनी भारताचे सैन्य पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याची गुप्त माहिती लीक करून देशासोबत एकप्रकारे देशद्रोह केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी अनिल अहीरकर यांनी केली. आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, जानबा मस्के, लक्ष्मी सावरकर, अशोक काटले, विशाल खांडेकर, प्रवक्ते श्रीकांत शिवणकर, रवी पराते, विक्रम परिहार, स्वप्निल अहिरकर, मेहबूब पठाण, मोहसीन शेख, निस्सार अली, अविनाश शेरेकर, एकनाथ फलके, अज्जू खान , शबाना सैय्यद, प्रमोद गारोडी, रेखाताई कृपाले आदींनी भाग घेतला.
काँग्रेसचे आज धरणे आंदोलन
- अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांचे नेतृत्वात संविधान चौकात सकाळी ११ वाजता धरणे दिले जाणार आहेत.