नागपूर : राज्यात तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादीने अशी घोषणा करीत काँग्रेसवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याची खेळी खेळली आहे.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही, असे वृत्त दोन दिवसांपूर्वीच लोकमतने प्रकाशित केले होते. बुधवारी राष्ट्रवादीचे नागपूर शहर निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास सक्षम असून कुणाशीही आघाडी करण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे लोकमतच्या वृत्तावरही शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसकडून नेहमीच राष्ट्रवादीशी दुजाभाव केला जातो. कमी लेखले जाते. त्यामुळे यावेळी आघाडी करण्याचा प्रस्ताव देऊन चर्चा करण्यातही राष्ट्रवादीने वेळ घालवू नये, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी निरीक्षकांसमोर मांडली. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, अल्पसंख्यक सेल अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आ. प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, प्रवीण कुंटे पाटील, गंगाप्रसाद ग्वालबंशी, आभा पांडे, बजरंग सिंह परिहार, वेदप्रकाश आर्य, जावेद हबीब, जानबा मस्के, दिलीप पनकुले, वर्षा शामकुले, सुरेश गुडधे पाटील, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.