नागपूर : एकीकडे विदर्भातून राष्ट्रवादीत नेत्यांची इनकमिंग सुरू झाली आहे. माजी खासदार सुबोध मोहितेसह, आभा पांडे, रवनिश पांडेय, प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन पक्षाचे बळ वाढविले असताना, जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचे काम सैरभैर झाले असून जिल्हाध्यक्ष फक्त नावापुरतेच असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीची ज्योत जिल्ह्यात तेवत ठेवणारे माजी गृहमंत्री ईडीच्या घेऱ्यात अडकल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकीत त्याचे परिणाम बघायला मिळाले आहे. आता राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदेतील गटनेत्याची निवडीसाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही.
जिल्ह्यात काटोल व हिंगणा विधानसभेत राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. जिल्हा परिषदेवर या दोन्ही विधानसभेतून राष्ट्रवादीचे बहुतेक सदस्य निवडून येतात. या दोन्ही मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १० जागेवर मजल मारली आणि सत्तेतही वाटा मिळविला. पण ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने राष्ट्रवादीचे ४ सदस्य अपात्र ठरले.
राष्ट्रवादीच्या एका सदस्याने ऐन पोट निवडणूकीच्या तोंडावर पक्ष बदल केला. मात्र माजी मंत्री रमेश बंग यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावत उमेदवार बदलवूनही जागा आपल्या ताब्यात ठेवली. मात्र पोट निवडणुकीत राष्ट्रवादीला २ जागांचा फटका बसला. सदस्यत्व रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादीचे गटनेतेही अपात्र ठरले. आता पोट निवडणुका पार पडल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसने लगेच पक्षाची बैठक घेऊन गटनेत्याची निवड केली.
भाजपाने अजूनही गटनेता जाहीर केला नाही, मात्र बैठका, सदस्यांचे मनोगत जाणून घेतले. पण राष्ट्रवादीत गटनेत्यासंदर्भात कुठलीही चर्चा बैठका नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पिल्लर असलेले अनिल देशमुख पोट निवडणुकीच्या पूर्वीपासूनच वादात सापडले आहे. त्यांचा मुलगा व जि.प. सदस्य सलील देशमुख यांचेही जिल्ह्याकडे किंबहुना मतदार संघाकडे दूर्लक्ष झाले. उमेदवार ठरविण्यापासून ते निवडणुकीची रणनिती आखण्यापर्यंत माजी मंत्री रमेश बंग यांनी पुढाकार घेतला.
या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्याचा आधार घ्यावा लागला. हातातील एक जागा बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला गमवावी लागली. जिल्हाध्यक्ष गुजर देखील पक्षाची मोट बांधायला अपयशी ठरले. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांचाही उत्साह हरविला आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील सदस्यांचा कुठला अजेंडा नाही. आपण सत्तेत आहो की विरोधात याबाबतही ते असंमजस आहे. आता उरलेल्या ८ सदस्यांना बांधून ठेवणारा गटनेताही नसल्याने सदस्यांनी जिल्हापरिषदेकडे पाठ दाखविली आहे.