वसीम कुरैशी
नागपूर : ‘पाण्याशिवाय जग कोरडे’ याचा प्रत्यय कोराडी रोडवर सुराबर्डी येथे निर्माणधीन एनडीआरएफएच्या ‘डिझॉस्टर व्हिलेज’ प्रकल्पात येत आहे. नदीच्या पाण्याचा उपयोग करण्यासंदर्भात पर्यावरणीय परवानगी न मिळाल्याने संस्था नव्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहे.
पर्यावरण विभागाने काही अटी ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यात येत आहेत. परिसराजवळील स्त्रोताचे पाणी दूषित आहे. परवानगी न मिळाल्यामुळे नदीच्या पाण्याचा उपयोग करता येत नाही. प्रशिक्षण मॉड्युलकरिता येथे जास्त पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याविना पुरासारख्या स्थितीत मदत आणि बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात अडचण येणार आहे.
सुराबर्डी येथे १४५ एकर जमिनीवर नॅशनल डिझॉस्टर रिस्पॉन्स फोर्स अकादमीने (एनडीआरएफए) डिझॉस्टर व्हिलेज बनविले आहे. २०१९ मध्ये या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. परंतु कोरोनामुळे कार्यावर परिणाम झाला. हे कार्य तीन वर्षांत, तीन टप्प्यात पूर्ण होणार होते, पण तीन वर्षांनंतरही थोडेच काम झाले आहे.
डिझॉस्टर व्हिलेजमध्ये काय विशेष असणार?
- कोलॅप्स स्ट्रक्चर, ओव्हरहेड ब्रिज, टनल, रेल्वेगाडी, हेलिकॉप्टर, केमिकल, बायोलॉजिकल, न्यूक्लियर, रेडियोलॉजिकल युनिट राहील. पुराची स्थिती निर्माण करण्यासाठी पाण्यात बुडविलेले एक स्ट्रक्चर तयार केले जाईल. जंगलात लागणाऱ्या आगीपासून बचाव, रस्ते अपघातात मदत, डॉग ट्रेनिंग परिसरात तयार करण्यात येणार आहे. डिझॉस्टर व्हिलेजमध्ये काही भाग पूर्णपणे शहरासारखा राहील, तर काही भाग गाव, जंगल, डोंगर आणि महामार्गासारखा राहणार आहे.