लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक ते मुंजे चौक दरम्यानच्या गोयल मॉल तगतच्या १६ दुकानावर नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने व्यापाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने १६ दुकानांवर हातोडा चालविला. यात काही जुन्या इमारतींचाही समावेश आहे.कारवाईला सुरुवात करताच काही व्यापाऱ्यांनी विरोध केला. नासुप्रने अचानक कारवाई सुरू करून शोरुम व दुकानातील साहित्य काढायलाही वेळ दिला नाही, असा त्यांचा आरोप होता. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शोरुमचे मालक व दुकानदारांना सामान बाहेर काढण्यासाठी काही वेळ देण्यात आला.नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही जमीन बुटी कुटुंबीयांच्या मालकीची आहे. येथे दुकानदार भाड्याने आहेत. बुटी कुटुंबाने ही जमीन गोयल गंगा ग्रुपला विकली. प्रकरण उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात सुरू होते. सर्वोच्च न्यायालयाने बुटी कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार दुकानदारांना हटविण्याची कारवाई केली जात आहे. मात्र , सामान हटविण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांची मुदत देण्याची मागणी दुकानदारांनी केली होती. सीताबर्डी मेन रोडवरील चाफेकर बंधू , विश्रांती गृह हॉटेल व अन्य दुकानदारांनी सामान बाहेर काढण्याला सुरुवात केली. त्यानंतर गेसन्स शोरुमच्या मागील बाजूच्या दुकानांचा भाग तोडण्याला सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारे पोकलँड व जेसीबीच्या साहाय्याने १६ दुकानांवर कारवाई करण्यात आली. मात्र काही दुकाने पूर्णपणे जमीनदोस्त करण्याला तीन ते चार दिवसाचा कालावधी लागणार आहे.ही कारवाई नासुप्रच्या विभागीय कार्यालयाचे(पश्चिम) कार्यकारी अभियंता प्रमोद धनगर, विभागीय अधिकारी पंकज आंभोरकर, विवेक डफरे, पी.आर.सहारे, अभय वासनिक व पथक प्रमुख मनोहर पाटील यांच्या पथकाने केली.यासंदर्भात गोयल-गंगा मिलचे अधिकारी आनंद सिरसाठ यांच्या माहितीनुसार या दुकानमालकांनी मॉलसाठी दुकाने दिली होती. परंतु त्यांनी आपल्या दुकानावर स्लॅब टाकून तीन मजली बांधकाम केले. दुकानदार त्यांच्या दुकानांच्या आकारानुसार नवीन मॉलमध्ये जागा मिळावी यासाठी अडून होते. प्रकरण सामोपचाराने निकाली निघावे यासाठी अनेकदा बैठकी झाल्या होत्या.मेन रोडवरील ३३ दुकानांना नोटीसनासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा-सीताबर्डी, खसरा क्रमांक ३२०, ३१५ येथील ३३ दुकानांना २४ एप्रिल २०१५ रोजी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु दुकानदार समोरील बांधकाम हटविण्याला राजी होत नव्हते. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई करण्यात आली. अभ्यंकर रोड व मेन रोड बर्डी येथील काही दुकानदारांसोबत समझोता करण्यात आला होता. परंतु काही लोक न्यायालयात गेले होते. अशी १६ दुकाने ड्रीम शॉपी, बे्रकफास्ट अॅन्ड ज्यूस कॉर्नर, सदानंद ज्यूस, बॉम्बेवाला, बाटा, सिलेक्शन हाऊ स, क्वॉलिटी क्लॉथ, राजकमल, सम्राट, फॅशन बाजार, चाफेकर बंधू, दुबे साऊं ड, केवल मेन्स, सोना सन्स, विश्रांती गृह, गेसन्सचा मागील भाग तोडण्यात आला.तीन दिवसांची मुदत दिलीनासुप्रची दुकाने तोडण्याची कारवाई सुरू असतानाच मेन रोडवरील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने नासुप्रच्या सभापतींची भेट घेतली. त्यांनी दुकानदारांना विनंतीनुसार सामान हटविण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली. तीन दिवसात दुकानदारांनी स्वत:हून सामान न हटविल्यास ९ फेब्रुवारीला नासुप्रचे पथक पुन्हा कारवाई करणार आहे.