लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शंभर टक्के लसीकरणासोबतच दुसरा डोस घेणे आवश्यक आहे; परंतु पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले तरी नागपूर शहरातील तब्बल दोन लाख लोकांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
नागपुरात लसीकरणासाठी १९.७३ लाख पात्र नागरिक आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत १८ लाख २७ हजार ५५९ लोकांनी पहिला डोस घेतला. तर १० लाख ९६ हजार ६५६ म्हणजे ५८ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला. ८४ दिवसानंतर दुसरा डोस घेणे आवश्यक आहे; परंतु आकडेवारीचा विचार करता दोन लाखाहून अधिक लोकांनी ८४ दिवसांनंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. मनपा प्रशासनाने विभाग प्रमुखांना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश दिले होते. यामुळे आजारी कर्मचारी वगळता सर्वांनी पहिला डोस घेतला आहे.
२५० कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार
महापालिकेतील १० हजार ४८२ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. आजारी व गर्भवती महिला असे ३२ कर्मचारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे; परंतु ८४ दिवसांनंतरही २५० कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. अशा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विभागांना दिले आहे.
‘हर घर दस्तक’ला प्रतिसाद
राज्य शासनाच्या आरोग्य विभागानुसार आता ‘हर घर दस्तक’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत लस न घेतलेल्या पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणाकरिता प्रवृत्त करण्यात येत आहे. शहरातील १०० टक्के पात्र नागरिकांना डोस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. एक लाखाहून अधिक घरांना आरोग्य पथकांनी भेटी दिल्या. नागरिकांचा मोहिमेला प्रतिसाद आहे.
लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी मनपातर्फे शहरात हर घर दस्तक अभियानांतर्गत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी लसीकरण करावे, असे आवाहन मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी केले आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस
आरोग्य सेवक - ४९६२८
फ्रंट लाइन वर्कर - ५६९५६
१८ वयोगट - १०१८०३१
४५ वयोगट - ३३८५४५
४५ कोमार्बिड - १०४६७६
६० सर्व नागरिक - २५९७२३
- पहिला डोस - एकूण - १८२७५५९
दुसरा डोस-
आरोग्य सेवक - ३०३८२
फ्रंट लाइन वर्कर - ३९२१६
१८ वयोगट - ५०५८५५
४५ वयोगट - २८७२४५
४५ कोमार्बिड - ४३७३२
६० सर्व नागरिक - १९०१९६
- दुसरा डोस - एकूण - १०९६६५६
संपूर्ण लसीकरण एकूण - २९२४२१५