- पाच जणांना अटक - ५० लाखांच्या बदल्यात मेडिकल प्रवेशाचे आमिष - परीक्षेसाठी डमी उमेदवारांचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी लाखो रुपये उकळून डमी उमेदवार परीक्षेला बसविण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचा सीबीआयने भंडाफोड केला आहे. या रॅकेटचे धागेदोरे थेट नागपुरात सापडले असून, येथील आर. के. एज्युकेशन या खासगी संस्थेमार्फत हा गोलमाल सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रॅकेटचा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार याच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१३ सप्टेंबर रोजी नागपुरातील काही बड्या शिकवणी वर्गाशी संबंधित व्यक्तींकडे सीबीआयच्या पथकाने छापे घातले होते. यात नंदनवनमधील ‘आर. के. एज्युकेशन करिअर गायडन्स’सह गणेशनगर, आझमशहा ले-आऊट भागातील शिकवणी वर्ग तसेच त्यांच्याशी संबंधितांच्या कार्यालयांचा समावेश होता. यानंतर आर. के. एज्युकेशनचा परिमल कोतपल्लीवार व त्याच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली होती. कोतपल्लीवारने दिलेल्या माहितीनंतर या घोटाळ्याचा धक्कादायक खुलासा झाला.
प्राप्त माहितीनुसार, कोतपल्लीवार याने १२ सप्टेंबर रोजी आयोजित नीट परीक्षा देण्यासाठी पाच डमी उमेदवार तयार केले होते. याची कुणकुण लागताच सीबीआयचे अधिकारी त्यांना पकडण्यासाठी परीक्षा केंद्रावर थांबले होते. मात्र, ते डमी उमेदवार परीक्षा केंद्रावर आलेच नाहीत.
अशी व्हायची डील
- वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरले जायचे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश होईल व त्याबदल्यात ५० लाख रुपये द्यावे लागतील, अशी डील व्हायची. संबंधित विद्यार्थ्याच्या बदल्यात डमी उमेदवार परीक्षा द्यायचा.
पोस्टडेटेड चेकने व्यवहार
- सीबीआयने केलेल्या चौकशीत पालकांनी कोतपल्लीवारकडे पोस्टडेटेड धनादेश तसेच विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची मूळ गुणपत्रिकादेखील जमा केल्याचे आढळून आले. ५० लाख रुपये भरल्यावर मूळ कागदपत्रे परत करण्यात येणार होते. पालकांनी विद्यार्थ्यांचे युझर आयडी व पासवर्डदेखील दिले होते. प्रवेशपत्रावर डमी उमेदवार ओळखू येऊ नये यासाठी छायाचित्राचे मॉर्फिंगदेखील करण्यात येत होते. शिवाय ई-आधारच्या माध्यमातून बोगस ओळखपत्रदेखील तयार करण्यात आली होती.
इतर कोचिंग क्लासेसही रडारवर
नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून सीबीआयने नागपुरातील पाच कोचिंग क्लासेसवर काही दिवसांअगोदर छापे टाकले होते. यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. आता इतर कोचिंग क्लासेसदेखील सीबीआयच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.