डी.के.हाजरा : जेरियाट्रिक सोसायटी आॅफ इंडियाचा पदग्रहण सोहळानागपूर : देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या विविध कारणांमुळे वाढत आहे. आयुर्मान वाढल्यानेही यात वाढ होत आहे. यामुळे बालरोगतज्ज्ञ सारखेच वृद्धरोग तज्ज्ञ असणे आवश्यक झाले आहे. मात्र, देशात केवळ चेन्नई मेडिकल कॉलेजमध्ये ‘जेरियाट्रिक’ (वयस्क लोकांना होणाऱ्या रोगांचा अभ्यास) हा डिप्लोमा कोर्स शिकविला जातो. वैद्यकीय अभ्यासक्रमातच याचा समावेश होण्याची गरज आहे, असे मत जेरियाट्रिक सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. डी.के. हाजरा यांनी येथे व्यक्त केले. जेरियाट्रिक सोसायटी आॅफ इंडिया (जीएसआय), विदर्भच्या पदग्रहण सोहळ्यापूर्वी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. दरम्यान डॉ. जयंत पांडे यांच्याकडे अध्यक्षपदाची तर डॉ. संजय बजाज यांच्याकडे सचिवपदाची धुरा सोपविण्यात आली. यावेळी जीएसआय, विदर्भाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस.एम. पाटील उपस्थित होते.डॉ. हाजरा म्हणाले, ४० वर्षांपूर्वी बालरोग शास्त्र हा विषय स्वतंत्र नव्हता. तो औषध वैद्यकशास्त्रामध्ये अंतर्भूत होता. तसेच ‘जेरियाट्रिक’ विषयाचे झाले आहे. भविष्यात हा विषय ही स्वतंत्र होईल. वृद्धत्वाची गती मंदावण्यावर संशोधनडॉ. हाजरा म्हणाले, काही लोकांमध्ये वृद्धत्व लवकर येते तर काहींमध्ये ते उशिरा येते. न्यूझीलंड येथील ‘युनिव्हर्सिटी आॅफ ओटागो’ येथे याच विषयावर संशोधन सुरू आहे. १९७२ मध्ये जन्मलेल्या काही लोकांवर हा अभ्यास सुरू आहे. वृद्धत्वाची गती कशी मंदावता येईल, याकडे तज्ज्ञाचे लक्ष आहे.वृद्धामध्ये वाढत आहे, मधुमेहाचे प्रमाण३० वर्षांपूर्वी गावांमधील ज्येष्ठ लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ०.५टक्के तर शहरांमध्ये १० टक्के होते. आता यात वाढ झाली आहे. गावांमध्ये २.५ टक्के तर शहरांमध्ये २० टक्के प्रमाण आहे. यामुळे युवा अवस्थेपासूनच या आजाराविषयी दक्ष राहून मधुमेह होऊच नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
बालरोगसारखेच वृद्धरोग तज्ज्ञाची गरज
By admin | Published: August 31, 2015 2:52 AM