नागपूर :अमली पदार्थ तस्करीचा बीमोड करताना सर्व यंत्रणांचा उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत बुधवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत नागपूरहून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होताना ते बोलत होते. ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ असा या परिषदेचा विषय होता. विविध राज्यांचे गृहमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात अतिशय कठोर पावले उचलली आहेत.
नागपुरातून या बैठकीत सहभागी होताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमली पदार्थविरोधी तस्करीशी लढा देताना पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण, व्यसनमुक्ती, जनजागरण, आंतरराज्यीय समन्वय आणि नव्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही चर्चा केली. या बैठकीला नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्र्यांसोबत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.