नागपूर : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशातील शेतक-याला बळ देण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे शेतक-यांना फायदा होईल, याप्रकारे किमान आधारभूत किंमत निश्चित झाली पाहिजे, याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लक्ष वेधले.रेशीमबाग मैदान येथे शनिवारी सकाळी झालेल्या संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवप्रसंगी डॉ. मोहन भागवत बोलत होते. ते म्हणाले, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, आयात-निर्यात धोरण, कर्ज इत्यादींचा फटका शेतकºयालाच बसतो आहे. नवीन पिढी शेतीकडे न वळता शहरांकडे येत आहे. त्यामुळे त्यांना बळ देण्याची गरज आहे.गोरक्षेच्या मुद्यावरून देशात मोठा वाद निर्माण झाला. गोरक्षा व्हायलाच हवी, मात्र गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणाºया समाजकंटकांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.यावेळी सरसंघचालकांनी सुरक्षादलांच्या कामगिरीचे कौतुक केले. काश्मीरमध्ये सुरक्षादलांना दिलेले स्वातंत्र्य स्वागतार्ह आहे.मुंबईतील दुर्घटना दुर्दैवीभाषणाची सुरुवात करताना डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकावर घडलेल्या घटनेवर दुख: व्यक्त केले. मात्र अशा घटनांनंतरही आयुष्य पुढे सुरूच राहते आणि ते ठेवावेच लागते, असे ते म्हणाले.पाक, चीनविरोधातील भूमिकेचे समर्थनपाकिस्तान आणि चीनसंदर्भातील कठोर भूमिकेबाबत सरसंघचालकांनी केंद्र शासनाची पाठ थोपटली. कणखर भूमिकेमुळे भारत काहीतरी करत आहे, याची नोंद जगानेही घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आपल्या मनात आदर निर्माण होत आहे. कुरापती करणाºया देशांना चोख उत्तर दिले जात आहे. डोकलाम प्रकरणी ज्याप्रकारे संयम ठेवला आणि कूटनीतीचा वापर केला गेला त्याचे कौतुक आहे, असे मोहन भागवत म्हणाले.रोहिंग्यांमुळे देशाच्या सुरक्षेला धोकासरसंघचालकांनी रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. बांगलादेशी घुसखोरांची समस्या अद्याप सुटली नसताना आता रोहिंग्यांचा प्रश्न पुढे आला आहे. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर ताण येणार नाही तर, देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होणार आहे. माणुसकी वैगेरे ठीक आहे, पण आपला विनाश करून माणुसकी दाखवता येत नाही, असे मत व्यक्त करत केंद्राच्या भूमिकेला शाबासकीची थाप दिली.बंगाल, केरळ शासनावर टीकाबंगाल आणि केरळ या दोन्ही राज्यांत संघ स्वयंसेवकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. सरसंघचालकांनी या राज्यातील हिंसाचारावर जोरदार टीका केली. दोन्ही राज्यांमधील राजकीय हिंसा चिंताजनक आहे. येथील शासनकर्त्यांकडून उदासीन भूमिका घेण्यात येत असून राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रविरोधी शक्तींना पाठिंबा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.काश्मीर विस्थापितांना समान अधिकार हवादेशात समान अधिकार कायदा लागू करावा, ही संघाची जुनी मागणी आहे. सरसंघचालकांनी त्याचाच पुनरुच्चार केला. काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूंना अद्यापही अधिकार मिळालेले नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार, आधारकार्डदेखील नाही. स्वातंत्र्यापासून काश्मीरचे नागरिक असूनदेखील त्यांच्याबाबत भेदभाव करण्यात येत आहे. याला संपविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.भागवत म्हणाले.मुख्यमंत्री, गडकरीसंघ गणवेशातविजयादशमी उत्सवाला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे संघाच्या नवीन गणवेशात स्वयंसेवक म्हणून आले होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हेदेखील बºयाच वर्षांनंतर विजयादशमी सोहळ््याला उपस्थित राहिले. याशिवाय आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, प्रमिलाताई मेढे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, खा. विकास महात्मे, नागपुरातील भाजपाचे सर्व आमदार, प्रतिभा अडवाणी, व्ही. एन. राजू, सुदर्शन वेणू, अपलक्रीश्नन, स्वामिनी ब्रम्हप्रकाशानंद हे उपस्थित होते.
शेतक-यांना आर्थिक बळ देण्याची गरज, किमान विक्रीमूल्य निश्चित व्हावे - सरसंघचालक मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 2:17 AM