लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील नागरिकांमध्ये अवयवदान करण्याबाबत पुरेशी जागृती नाही. त्यामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये अवयवदान करण्याबाबत उदासीनता आहे. अवयवदात्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मत विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केले. आयएमए, विभागीय आयुक्त कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारपासून अवयवदान सप्ताहाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, झेडटीसीसीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी, माहिती संचालक हेमराज बागुल प्रामुख्याने उपस्थित होते. मध्य भारतातील एक महत्त्वाचे मेडिकल हब म्हणून नागपूर ओळखले जाते. मात्र अद्यापही अवयवदानाबाबत फारशी जागृती नाही. या सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिक तसेच रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अवयवदानाप्रती असलेले अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी वेळेत अवयवांची आवश्यकता असते. याबाबतची सूक्ष्म माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी पद्धत अधिक सुलभ आणि सोयीची करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
१४ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
अवयवदान सप्ताहामध्ये डॉ. विभावरी दाणी झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन केंद्राबाबत मार्गदर्शन करतील. १२ ऑगस्ट रोजी डॉ. प्रकाश खेतान किडनीदानावर, १३ ऑगस्ट रोजी डॉ. निखिलेश वैरागडे व डॉ. समीर जहागीरदार डोळे व त्वचादानावर तर, १४ ऑगस्ट रोजी डॉ. राहुल सक्सेना यकृतदानावर मार्गदर्शन करतील.