नागपूर : ‘लिव्ह इन पार्टनर’ने केलेल्या हत्येवरून राजकारणदेखील तापले आहे. भाजपच्या प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी अशी प्रकरणे पाहता राज्यातही ‘लव्ह जिहाद कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान त्या बोलत होत्या.
वसईतील श्रद्धा वालकर हिची तिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ आफताब पुनावाला याने ज्या पद्धतीने हत्या केली ते पाहता त्याला फाशीच व्हायला हवी. अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. दबावातून आंतरधर्मिय विवाह करून मग अत्याचार करण्याची प्रकरणेदेखील दिसून येतात. उत्तर प्रदेशातील लव्ह जिहादविरोधी कायद्यानुसार मुस्लिम व्यक्तीने हिंदू तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर केल्यास पाच वर्षांचा कारावास आणि १५ हजार रुपये दंड आहे तर मुलगी अनुसूचित जाती, जमातीची वा आदिवासी आणि अल्पवयीन असल्यास किमान दोन ते सात वर्षे कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची तरतुद आहे. महाराष्ट्रातदेखील असा कायदा गरजेचा आहे, असे त्या म्हणाल्या.
अडीच वर्षात आम्ही अनेकदा आंदोलने केली. मात्र महाविकास आघाडी सरकारने आमचे त्यावेळी एकले नाही. मात्र, आता आमचे सरकार आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
संजय राठोडांविरोधातील लढाई सुरूच
यावेळी त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधातील लढाई सुरूच असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या राजीनाम्यावर मी ठाम आहे. प्रत्येक जिल्ह्यात मला संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. पण, माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. पीडितेली मी ओळखतही नव्हते व ती माझ्या जातीची नव्हती तरीही मी लढत आहे, असे त्यांनी सांगितले.