लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरणाशी संबंधित धोके आपण कमी करू शकत नाही. मात्र, त्यांच्यापासून आपल्याला जास्त नुकसान होणार नाही, यासाठी नियोजन नक्कीच करू शकतो. शहरीकरण थांबविणे शक्य नाही. मात्र, शहरांच्या हद्दीत पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या मॉडेलला विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे मत एनआयडीएमच्या ईसीडीआरएम विभागाचे प्रमुख प्रा. अनिल गुप्ता यांनी व्यक्त केले. गृहमंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते २८ मेदरम्यान आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती जोखीम कपात, या विषयावर तीन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण व विद्याशाखा विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जबाबदारी नागपूरच्या दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालयाकडे सोपविण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
एनआयडीएमचे कार्यकारी संचालक मेजर जनरल मनोज कुमार बिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष एच. आर. बाखरू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तीन दिवसांत सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी आणि डॉ. आय. पी. केसवानी, डॉ. एस. व्ही. कसबेकर, नीरज बाखरू यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रांमध्ये १० महत्त्वपूर्ण विषयांवरील तज्ज्ञांनी व्याख्यान दिले. यात आशिष कुमार पांडा, प्रा. चंदन घोष, नकुल तरुण, अवधेश कुमार, डॉ. अरुण ए.,डॉ. राजकुमार खापेकर, डॉ. राजलक्ष्मी, प्रा. गिरीश चंद्र, नीरज अग्रवाल यांचा समावेश होता. नैसर्गिक धोक्यांमुळे होणारे नुकसान आपत्ती व्यवस्थापनातून टाळता येऊ शकते. यातून नवीन धोक्यांपासून आपण निश्चित वाचू शकतो, असे प्रतिपादन एच. आर. बाखरू यांनी केले. डॉ. एस. व्ही. कसबेकर यांनी प्रास्ताविक केले. या प्रशिक्षणाला देशभरातील हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. डॉ. जयंत वाळके यांनी संचालन केले, तर कार्यक्रम संयोजक नवीन अग्रवाल यांनी आभार मानले.