महेश शर्मा :भारतीय सर्वेक्षण विभागाच्या पुरातत्त्व भवनाचे उद्घाटननागपूर : प्रत्येक देशातील संस्कृतीमध्ये भूतकाळासोबतच तेथील मार्गदर्शक इतिहासही दडला असतो. भविष्यातील प्रगती साधण्यासाठी भूतकाळाची माहिती घेणे आवश्यक असते, असे मत केंद्रीय संस्कृती, पर्यटन व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते शनिवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सेमिनरी हिल्सस्थित नवनिर्मित पुरातत्त्व भवनाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.देशातील गड, किल्ले हे गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. जर मनुष्य भूतकाळ विसरला तर भविष्यातील प्रगती साधणे कठीण जाते. पुरातत्त्व विभाग भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचे मौलिक काम करत आहे. त्यांनी ‘डिजिटलायझेशन’वर जोर देण्याची गरज आहे. नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर या विभागाच्या कार्यास आणखी गती मिळेल, असे ते म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, विभागाचे प्रादेशिक संचालक एम. महादेवय्या, अधीक्षक पुरातत्त्वज्ज्ञ नंदिनी भट्टाचार्य शाहू व पुरालेख शाखेचे संचालक जी.एस.ख्वाजा उपस्थित होते. रामटेकमध्ये येत्या २० नोव्हेंबर रोजी कालिदास उत्सवाचे आयोजन होणार आहे. यानंतर नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन होईल. या सभागृहाचे नुतनीकरण सुरू असून त्याअगोदर हे कार्य पूर्ण होईल, असा विश्वास अनुपकुमार यांनी व्यक्त केला. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले तर नंदिनी भट्टाचार्य शाहू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
भविष्यातील प्रगतीसाठी भूतकाळाची माहिती हवी
By admin | Published: October 25, 2015 3:06 AM