नितीन गडकरी : कल्याण मूकबधिर विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव नागपूर : बदलत्या तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे. या स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थी टिकावेत असे वाटत असेल तर या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शनिवारी रेशीमबाग येथे कल्याण मूक-बधिर विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नागो गाणार, कांचन गडकरी, भारतीय बालरोग तज्ज्ञ संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष सोम, संस्थेच्या अध्यक्ष शैलजा सुभेदार, उपाध्यक्ष विभावरी दाणी, सचिव शुभदा आंबेकर, कोषाध्यक्ष अंजली लघाटे, शाळा प्रमुख मालू क्षीरसागर उपस्थित होते. ५० वर्षांचा इतिहास असलेल्या या संस्थेला डिजिटल करण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती सरकारतर्फे करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. विद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण यावेळी झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृती व विज्ञान प्रयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांनी केले. यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.(प्रतिनिधी)
दिव्यांगांना अत्याधुनिक शिक्षण देण्याची गरज
By admin | Published: April 10, 2017 2:40 AM