लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आशियाई देशांमध्ये इतरांचे अस्तित्व नष्ट करून केवळ आपलेच अस्तित्व जगमान्य व्हावे इथपर्यंत संरक्षणविषयक स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी संरक्षण व अंतरिक्ष कौशल्य या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ निर्मितीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. नागपूर विद्यापीठातर्फे संरक्षण व अंतरिक्ष तंत्रज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रमांसाठी स्थापित कौशल्य विकास केंद्राचे बुधवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. (The need for security courses in universities to become self-reliant in the field of defense) (Bhagat singh Koshyari)
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ग्रुप कॅप्टन, ग्रुप कमांडर एनसीसी एम. कलीम प्रामुख्याने उपस्थित होते. देशाचे मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व भविष्यात संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी असलेल्या नागपुरात यासाठी अभ्यासक्रम सुरू होतो, ही अभिमानास्पद बाब आहे. या अभ्यासक्रमाने मनुष्यबळ निर्मितीला वाव मिळणार आहे. विद्यापीठाने या अभ्यासक्रमाकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
११ अभ्यासक्रमांची सुरुवात होणार
या कौशल्य विकास केंद्रात आयटीआय, पदविका, पदवीधारक यांच्यासोबतच कौशल्यावर आधारित एकूण ११ अभ्यासक्रम राहणार आहेत. पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमांमुळे संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाचे संचालक, विद्यार्थी कल्याण यांच्याकडे या अभ्यासक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला तीस जागांचे नियोजन आहे.
असे आहेत प्रमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- एरोस्पेस कन्व्हेंशनल मशिनिस्ट
- एरोस्पेस सीएनसी मशिनिस्ट
- एरोस्पेस सीएनसी प्रोग्रामर
- एरोस्पेस प्रिसिजन असेम्ब्ली मेकॅनिकल फिटर
- एरोस्पेस स्ट्रक्चरल फिटर
- एरोस्पेस डिझाइन टेस्टिंग इंजिनिअर