लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात ग्रामीण भागाच्या विकासाला प्राथमिकता देणे ही चांगली बाब आहे. बहुतेक विकासाचे धोरण राजधानीत ठरतात व त्यासाठी तंत्रज्ञान आयात केले जाते. मात्र हे तंत्रज्ञान त्या परिस्थितीशी जुळणारे आहे काय, याचा विचार केला जात नाही व ते फोल ठरते. आठ-दहा वर्षांनी परत नव्याने विचार करावा लागतो. आपल्या देशात सातत्याने हे असेच सुरू आहे. तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी परिस्थितीशी अनुकूल ठरेलच असे नाही. ग्रामीण आणि शहरी विषमतेची दरी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाचे धोरण राबविताना तेथील ज्ञान, ज्ञानावर आधारित संस्था व तेथील तंत्रज्ञानाचा वापर केला तरच ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधता येईल, असे परखड मत प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.वनराई फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार अजय संचेती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, रवींद्र धारिया, व्हीएनआयटीचे प्रा. दिलीप पेशवे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, ग्रामीण व शहरी विषमता दूर करायची असेल तर ग्रामीण भागात ज्ञानाच्या सोयी उपलब्ध करून तेथील तंत्रज्ञान सुधार करण्याची गरज आहे. या विचारातून पंढरपूर व गडचिरोली येथे प्रकल्प राबवीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अणुऊर्जा क्षेत्रात काम करताना देशाला अणुशक्तीसंपन्न ध्येय डोळ्यासमोर होते. अणुस्फोेट केल्यानंतर जागतिक निर्बंधाचा सामना करावा लागला होता. मात्र अणुशक्तीचा उपयोग शांती आणि विकासासाठी करता येतो, ही बाब पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. देश स्वातंत्र्य होण्यासाठी आवश्यक बाबी आणि देश स्वायत्त होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी अणुऊर्जा महत्त्वाची आहे. म्हणूनच गांधीवादी घराण्यातून असलो तरी परमाणु संशोधनात गेलो आणि त्यात विरोधाभास वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवृत्तीनंतर ऊर्जा, संपूर्ण शिक्षण आणि विज्ञानावर आधारित ग्रामीण विकासासाठी कार्य करण्याचे ध्येय स्वीकारल्याचे सांगत, यात शक्य तेवढे कार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी गिरीश कुबेर यांनी डॉ. काकोडकर यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. अजय संचेती यांनी उत्तुंग व्यक्तीच्या नावाने डॉ. काकोडकर यांच्यासारख्या तोलामोलाच्या व्यक्तीला पुरस्कार दिल्याची भावना व्यक्त केली. अणुऊर्जेच्या क्षेत्रात त्यांचे कार्य विशाल असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी तर संचालन अजय पाटील यांनी केले.नदीजोड हे राक्षसी स्वप्न : डॉ. अभय बंगपूर्व विदर्भात वैनगंगा नदीच्या पात्रात सरप्लस पाणी असल्याने नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तिकडे पाणी गरज असलेल्या ठिकाणी वळविण्याच्या निर्णयाला नुकतीच मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आल्याचा उल्लेख डॉ. अभय बंग यांनी केला. यामागे चांगला हेतू असल्याचे भासविले जात असले तरी ते राक्षसी स्वप्न असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील, अशी टीका त्यांनी केली. निसर्गानेच संपत्तीची असमान विभागणी केली आहे. आता चुकीच्या पद्धतीने जलसाठा मुबलक दर्शवून नद्याच वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. त्याचे पर्यावरणीय आणि राजकीय परिणाम चिंतेचा विषय आहे. संसाधने मिळाली नाहीत म्हणून ज्या घटकाने हातात शस्त्र घेतले, त्याच घटकाचा जलाधिकारही हिरावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. वेळीच या प्रकाराला आळा घातला गेला नाही तर वैनगंगा बचाओ आंदोलन करण्याची वेळ येऊ शकेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले.
शाश्वत ग्रामीण विकास साधणारे तंत्रज्ञान आवश्यक : अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:59 PM
देशात ग्रामीण भागाच्या विकासाला प्राथमिकता देणे ही चांगली बाब आहे. बहुतेक विकासाचे धोरण राजधानीत ठरतात व त्यासाठी तंत्रज्ञान आयात केले जाते. मात्र हे तंत्रज्ञान त्या परिस्थितीशी जुळणारे आहे काय, याचा विचार केला जात नाही व ते फोल ठरते. आठ-दहा वर्षांनी परत नव्याने विचार करावा लागतो. आपल्या देशात सातत्याने हे असेच सुरू आहे. तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी परिस्थितीशी अनुकूल ठरेलच असे नाही. ग्रामीण आणि शहरी विषमतेची दरी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाचे धोरण राबविताना तेथील ज्ञान, ज्ञानावर आधारित संस्था व तेथील तंत्रज्ञानाचा वापर केला तरच ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधता येईल, असे परखड मत प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देराष्ट्रनिर्माण पुरस्कार स्वीकारताना मांडले मनोगत