लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धार्मिक आणि आध्यात्मिक उद्योग हा देशातील चित्रपट आणि इतर सर्व उद्योगांपेक्षा मोठा उद्योग झाला आहे. बिना भांडवलाचा उद्योग असल्याने या क्षेत्रात प्रचंड दुकानदारी वाढली आहे. अनधिकृत लोकांनी व्यवसाय बनवून या पवित्र क्षेत्राचा ताबा घेतला आहे. ही दुकानदारी संपविण्यासाठी चांगल्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी ‘टेम्पल मॅनेजमेंट’ची आणि संस्थानिकीकरण करून पारदर्शक कारभार करण्याची गरज आहे, असे रोखठोक मत साईबाबा संस्थान, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी व्यक्त केले. ते स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या २१ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते.राष्टÑसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने परवानगी नाकारल्याने चर्चेचा विषय ठरलेला दादासाहेब काळमेघ यांचा पुण्यतिथी समारोह धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलताई देशमुख सभागृहात पार पडला. याप्रसंगी स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ, सचिव हेमंत काळमेघ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस.टी. देशमुख, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम, स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस. चंगोले, कार्याध्यक्ष डॉ. चांदेकर, आर.एम. सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. सुरेश हावरे यांनी पुढे बोलताना साई संस्थानचा चेहरा समाजाभिमुख करण्याचा विश्वास दिला. देव आहे किंवा नाही, हा प्रश्न महत्त्वाचा नाही, पण देशातील ६.५ लाख खेड्यात ३० लाख मंदिरे निर्माण झाली, हे लक्षात घ्यावे लागेल. ही मंदिरे सामान्य माणसांनी निर्माण केली आहेत. ज्याची गरज असते त्याची निर्मिती होते, ही संकल्पना मान्य केली तर माणसाला देवाची गरज आहे, हे यातून सिद्ध होते. या गरजेतून दुकानदारी वाढली आहे. धर्माची ही दुकानदारी थांबविण्यासाठी काही लोकांची मक्तेदारी संपवून संस्थानिकीकरण करण्याची गरज आहे. मंदिर व्यवस्थापन हा विषयच शिक्षण संस्थांमधून शिकविला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिर्डी मंदिरावर आक्षेप घेणाऱ्यांनी घ्यावा, मात्र या संस्थानाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना रोजगार मिळत आहे, दोन रुग्णालयांमधून १५ लाख लोकांना महागातील महाग उपचार नि:शुल्क उपलब्ध केला जातो, सहा हजार मुलांना शिक्षण दिले जाते, ही बाब नाकारता येणार नाही.शिर्डीमध्ये दररोज १५० लोक रक्तदान करीत असून यातून महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांना व गरजूंना रक्तपुरवठा होतो. साईबाबांच्या समाधीवर चढविलेल्या निर्माल्यातून बचत गटांच्या २०० महिलांना रोजगार मिळाला आहे व आता दर्शनासाठी येणाºया भक्तांच्या पावलांच्या दबावातून विद्युत निर्मितीचा प्रकल्प यशस्वी करण्याकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. एलआयटीमध्ये शिक्षण काळातील आठवणी सांगत दादासाहेब काळमेघ यांचे अनेक ऋण आपणावर असल्याचे डॉ. हावरे म्हणाले. त्यांच्यात प्रचंड निर्णयक्षमता होती, आव्हान स्वीकारण्याची धमक होती व त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. दादासाहेब स्वत:च्या प्रतिभेने, गतीने व स्वत: ठरविलेल्या दिशेने चालणारे वादळ होते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी हेमंत काळमेघ, पुरण मेश्राम व डॉ. पंकज चांदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी.एस. चंगोले व संचालन डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.विद्यापीठाच्या निर्णयाची खंत, पण..विद्यापीठाने कार्यक्रमासाठी दीक्षांत सभागृह देण्यास नकार देण्याच्या वादाला काळमेघ बंधूंनी उत्तर दिले. लोकमतने या विषयाला वाचा फोडली होती. शरद काळमेघ यांनी लोकमतचा उल्लेख करीत वर्तमानपत्र व समाजाने याविषयावर मांडलेली भूमिका दादासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची दर्शविणारी आहे. विद्यापीठाच्या निर्णयाबद्दल खंत आहे, पण विचारसरणी परवानगीच्या आड येऊ शकत नाही. विद्यापीठाने यापूर्वी कार्यक्रमाना परवानगी दिली, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे पुढच्या वषीर्ही या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली जाईल. पण, ती पुन्हा नाकारल्यास एकाच दिवशी ११ ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याची घोषणा त्यांनी केली. यादरम्यान डॉ. सुरेश हावरे यांनीही हा सोहळा मुंबईत घेण्याचे निमंत्रण प्रतिष्ठानला दिले.
धार्मिक दुकानदारी संपविण्यासाठी ‘टेम्पल मॅनेजमेंट’ची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:55 AM
धार्मिक आणि आध्यात्मिक उद्योग हा देशातील चित्रपट आणि इतर सर्व उद्योगांपेक्षा मोठा उद्योग झाला आहे. बिना भांडवलाचा उद्योग असल्याने या क्षेत्रात प्रचंड दुकानदारी वाढली आहे. अनधिकृत लोकांनी व्यवसाय बनवून या पवित्र क्षेत्राचा ताबा घेतला आहे. ही दुकानदारी संपविण्यासाठी चांगल्या लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी ‘टेम्पल मॅनेजमेंट’ची आणि संस्थानिकीकरण करून पारदर्शक कारभार करण्याची गरज आहे, असे रोखठोक मत साईबाबा संस्थान, शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी व्यक्त केले. ते स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या २१ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते.
ठळक मुद्देसुरेश हावरे यांचे रोखठोक मत : स्व. दादासाहेब काळमेघ यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम