लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाची फाळणी व भाषेच्या नावावर झालेली राज्यांची निर्मिती या दोन मोठ्या चुका होत्या. मात्र आता जातीच्या नावावर विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण एकीकडे जातीभेद नष्ट व्हावा, अशी भाषणे देतात आणि दुसरीकडे जातीच्या नावावर आरक्षण मागतात. या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळे जातीभेदाच्या निर्मूलनासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे मत देशाचे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्कार व तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.हिंदी मोरभवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, सचिव डॉ.अजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष शिरीष दामले प्रामुख्याने उपस्थित होते. आ.संजय पुराम, सविता पुराम यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्काराने तर प्रतिमा शास्त्री यांचा तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आपल्या देशात सावरकरांना योग्य तो सन्मान देण्यात आला नाही. सावरकर द्रष्टे होते. त्यांची प्रेरणा घेऊन राजकारणात चांगल्या तरुणांनी येण्याची गरज आहे. जातीय भेदभाव संपावा यासाठी सामाजिक आंदोलन निर्माण झाले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.सिंह यांनी केले. यावेळी आ.संजय पुराम, सविता पुराम व डॉ.प्रतिमा शास्त्री यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजय कुलकर्णी यांनी केले. डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अनिल देव यांनी संचालन केले तर मिलिंद कानडे यांनी आभार मानले. प्रशांत उपगडे व जयंत उपगडे यांनी यावेळी सावरकर लिखित गीत व वंदेमातरम्चे सादरीकरण केले.शस्त्रांच्या बाबतीत देश स्वावलंबी होतोय : अहीरस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जातीव्यवस्थेविरोधात आवाज उठविला होता. देशात जातीच्या आधारावरील भेदाभेद संपविण्याची गरज आहे. देशाने शस्त्रसंपन्न असले पाहिजे. बलवान असल्यावर समोरचे लोक झुकतात, असे सावरकर नेहमी म्हणायचे. सावरकरांच्या विचारांचा आदर्श घेऊनच देश शस्त्रसंपन्न होत आहे. ७० टक्के शस्त्रांचे उत्पादन देशात होत आहे. शस्त्रसज्जतेच्या बाबतीत आपण स्वावलंबी होत आहोत, असे अहीर यांनी सांगितले.गुंड आणि विद्वानांच्या मताचा दर्जा एकच कसा ?यावेळी डॉ.सत्यपाल सिंह यांनी मतदानाच्या पद्धतीवरच आक्षेप नोंदविला. समाजाला त्रासवून सोडणारा गुंड व आपल्या विद्वत्तेच्या जोरावर विधायक कार्य करणारे विद्वान यांच्या मताचा दर्जा एकच कसा असतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा फार मोठा विरोधाभास आहे. यावर विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.