वामनराव तेलंग : शंकर बडे व मालतीतार्इंच्या रचनांचे विवेचननागपूर : विदर्भातील साहित्यिकांनी अनेक दर्जेदार रचना केल्या आहेत. मात्र हे साहित्य लोकापर्यंत पोहचत नाही. कधी कधी हे साहित्य वरवरचे वाटते व वाचताना खोल तळाशी रुजत नाही. काही साहित्यिकांना सर्वमान्यता मिळाली, मात्र अनेकांच्या रचना दुर्लक्षित राहिल्या आहेत. अशा विदर्भातील साहित्याचा मागोवा घेण्याची गरज आहे, असे मत विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामनराव तेलंग यांनी केले. वि.सा. संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.वि.सा. संघाच्यावतीने ग्रंथसहवास येथे रचनेच्या खोल तळाशी या कार्यक्रमात विदर्भातील साहित्यिक कवी शंकर बडे यांच्या कविता व मालतीताई निमखेडकर यांच्या कथालेखनाचे विवेचन करण्यात आले. यावेळी वामनराव तेलंग यांनी वऱ्हाडी भाषेत लिहिणाऱ्यांची उणीव असल्याची खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर आंदोलने होतात, लिखाण केले जाते. परंतु ते वरवरचे वाटते. वाचताना खोल तळाशी ते रुतत नाही. शंकर बडे यांनी आपल्या कवितांमधून शेतकऱ्यांचे दु:ख मांडले. मात्र ते महाराष्ट्रापर्यंत पोहचले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मालतीताई यांनी समाजाला बोध देणारे नीतीमानतेचे लेखन ताकदीने केले. लोकांना उद््बोधन करण्याची जाणीव त्यांच्या लेखनात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपले प्रकाशक बाल साहित्याकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी यावेळी नमूद केली. शंकर बडे यांच्या कवितांचे अवलोकन करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी शंकर बडे यांच्या साहित्याला वऱ्हाडी मातीचा गंध असल्याचे सांगितले. त्यांच्या कवितांचा प्रवास विनोदापासून चिंतनापर्यंत झाला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा व कथा त्यांनी दमदारपणे मांडल्या. विनोदी ते गंभीर कविता हा त्यांचा प्रवास त्यांच्या अनुभवाशी प्रामाणिक आहे. त्यांच्या काव्यातून वऱ्हाडी बोलीची श्रीमंती दिसून येते. लोकांच्या व्यथा व कथा लोकभाषेत मांडणारा म्हणूनच सर्वांना आपलासा वाटणारा हा कवी होता, अशी भावना एदलाबादकर यांनी व्यक्त केली. ज्योती पुजारी यांनी मालतीताई निमखेडकर यांच्या ‘कर्मणी प्रयोग’ या कथेचे यावेळी कथन केले. हर्षवर्धन निमखेडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वृशाली देशपांडे यांनी केले. (प्रतिनिधी)
वैदर्भीय साहित्याचा मागोवा घेण्याची गरज
By admin | Published: September 19, 2016 2:49 AM