नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)च्या वैज्ञानिकांनी तयार केलेल्या सोलर एनर्जी पार्कचे सोमवारी नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्वच्छ ऊर्जा, स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील अशा सौर ऊर्जेवर चालणारे साहित्य या पार्कमध्ये ठेवण्यात आले आहेत. नीरीमध्ये येणारे विद्यार्थी, पर्यटक आणि सामान्य जनतेमध्ये सौर ऊर्जेबाबत जनजागृतीसोबतच विविध उद्योजक आणि इतर लाभार्थ्यांना तांत्रिक माहिती पुरविण्यासाठी नीरीचे सोलर एनर्जी पार्क लाभदायक ठरणार आहे.पर्यावरणीय साहित्य विभागाच्या प्रधान वैज्ञानिक डॉ. साधना रायलू यांच्या नेतृत्वात नीरी येथील वैज्ञानिकांद्वारे करण्यात आलेल्या व्यापक संशोधनातून या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. प्लास्मोनिक मटेरियल्सवर आधारित नीरी-सी-सोलगॅस जनरेटर, नीरी-सी-सोलर आॅटोक्लेव्ह, नीरी-सी-सोलस्टील, नीरी-सी- वॉटरहीटर, ड्रायर, सोलर कॉन्सन्ट्रेटर, प्लास्मोनिक हायड्रोजन जनरेटर, सोलर कुकर, फोटोफ्यूएल सेल, वॉटर इलेक्ट्रोलयझर या आणि इतर सोलर साहित्यांची निर्मिती नीरी, ग्रीनलाईफ सोल्यूशन आणि हॉरिझोन फ्यूएल सेल इंडिया लिमिटेड, नागपूरच्यावतीने करण्यात आली आहे. यासोबतच भविष्यातील पर्यावरणासमोरील आव्हाने आणि ऊर्जेची गरज लक्षात घेता सोलर एनर्जी पार्कमध्ये सोलर पीव्ही पॉवर प्लॅन्ट आॅन ग्रीड, सोलर फोटोव्होल्टाईक वॉटर पंप, सोलर पॅराबोलिक डिश कुकर, सोलर थर्मल उपकरण तसेच पीव्ही आधारित बॅटरीवर चालणारी सायकल आणि चारचाकी वाहनांची प्रयोगात्मक माहिती या पार्कमध्ये देण्यात येत आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठीच नाही, तर पाणी आणि सांडपाण्यावरील प्रक्रिया, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छ हवा आणि जैव-वैद्यकीय उपयोगासाठीही सौर ऊर्जेचे कसे महत्त्व आहे. याबाबतची सर्व माहिती विविध उपकरण आणि प्रयोगाद्वारे सोलर एनर्जी पार्कमध्ये दाखविण्यात आली आहे. येत्या २३ ते २५ नोव्हेंबर रोजी ‘शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जेचे उपयोजन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत येणाऱ्या प्रतिनिधींना सोलर एनर्जी पार्कअंतर्गत प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याची माहिती नीरीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांच्या मार्गदर्शनात आणि डॉ. साधना रायलू यांच्या नेतृत्वात डॉ. नितीन लाभशेटवार, डॉ. ए.के. बन्सीवाल, डॉ. एम.डी. गोयल, डॉ. तन्वीर आरफीन, जी.के. हिप्परगी, सुहासिनी मोरे, संदीप चिदमलवाड, अभय कोटकोंडवार, अनुश्री चिलकलवार, नीलेश मनवर, इतर ज्येष्ठ वैज्ञानिक, वरिष्ठ व कनिष्ठ संशोधक विद्यार्थ्यांचा सोलर एनर्जी पार्कच्या निर्मितीत मोठा सहभाग आहे. (प्रतिनिधी)
नीरीच्या सोलर एनर्जी पार्कचे लोकार्पण
By admin | Published: September 15, 2015 6:04 AM