निशांत वानखेडे
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०७० पर्यंत भारत देश कार्बनमुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली.
संचालक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लाेकमतशी बाेलताना डाॅ. वैद्य यांनी त्यांच्या भविष्यातील याेजनांबाबत भूमिका मांडली. स्वच्छ पर्यावरण हे नीरीचे ब्रीदवाक्य आहे. पर्यावरण बदल, ग्लाेबल वार्मिंग या समस्या जगाला भेडसावत आहेत. त्यानुसार कार्बन आणि ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कसे नियंत्रित करता येईल, याबाबत कार्य केले जाणार आहे. निघणारे कार्बन कॅप्चर करून त्याचा पुनर्वापर करण्यावर संशाेधन कार्य सुरू आहे. नीरी येत्या तीन-चार वर्षात बरेचशे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया विकसित करेल व हे संशाेधन कार्य जनतेला दिसेल, असा विश्वास डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केला.
काेराडी औष्णिक वीज प्रकल्पाजवळ बांबू प्लॅन्टेशनचा प्रकल्प यशस्वी केला आहे. त्यानुसार ओसाड जमिनीवर अधिकाधिक वृक्षाराेपण कसे करता येईल, यासाठीच्या प्रक्रियेबाबत काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जलप्रदूषण, वायूप्रदूषण याबाबत सुरू असलेले नेहमीचे संशाेधन सुरूच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
संशाेधनकार्य लाेकाभिमुख व पारदर्शक करण्यावर भर
शासकीय संस्था म्हणून सरकारच्या धाेरणाशी नीरी बांधील आहे. त्या धाेरणाला धरून स्वच्छ पर्यावरणासाठी संस्थेमध्ये हाेणारे संशाेधन कार्य लाेकांना सहज उपलब्ध हाेईल, समाजाला त्याचा फायदा हाेईल, या भूमिकेतून कार्य केले जाणार आहे. नीरीने नेहमी लाेकांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले आहे. पण यापुढे ते अधिक लाेकाभिमुख करण्यावर भर राहील, अशी भावना डाॅ. वैद्य यांनी व्यक्त केली. नीरी संस्था कायम विद्यार्थी फ्रेन्डली राहिली आहे व पुढेही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
घनकचरा व्यवस्थापनाला वैज्ञानिक जाेड देण्याचा प्रयत्न
देशात स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचा क्रमांक घसरला, यावर विचारले असता त्यांनी सांगितले, शहरातील घनकचरा व्यवस्थापन व अंमलबजावणी हे स्थानिक प्रशासनाच्या कार्याचा भाग आहे. पर्यावरण संस्था म्हणून तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची प्रक्रिया विकसित करणे हा आमच्या कार्याचा भाग आहे. शहरातील घनकचऱ्याचे विकेंद्रीकरण प्रक्रियेने व्यवस्थापन करता येईल काय, यावर कार्य सुरू आहे. याशिवाय पुन्हा नव्या पद्धती विकसित करून प्रशासकीय भागाला वैज्ञानिक पद्धतीची जाेड देण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका डाॅ. वैद्य यांनी मांडली.
भविष्यातील महामारीसाठी सज्ज
काेराेनासारख्या आजाराच्या उपचारासाठी सीएसआयआरच्या इतर संस्था कार्यरत आहेतच. त्यांना सहायक म्हणून नीरीचे कार्य सुरू राहील. काेराेनाच्या डिटेक्शनच्या प्रक्रियेत नीरीने महत्त्वाचे याेगदान दिले आहे. काेराेना डिटेक्शन हब म्हणून नीरीने काम केले आहे. पर्यावरण बदल किंवा ग्लाेबल वार्मिंगमुळे भविष्यात अशा आजारांचा प्रकाेप हाेण्याची शक्यता आहे. अशावेळी संशाेधन संस्था म्हणून मॅंडेटमध्ये जे कार्य राहील, ते आम्ही करू. अशा समस्यांशी निपटण्यासाठी आम्ही सज्ज आहाेत, असा विश्वास त्यांनी दिला.
औद्याेगिक कचरानिर्मिती कमी करण्यावर भर
उद्याेगातून निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापनाची पद्धत आतापर्यंत वापरली जात आहे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक असते. त्यापेक्षा उत्पादनावर परिणाम हाेऊ न देता औद्याेगिक कचऱ्याची निर्मितीच कशी कमी करता येईल, यानुसार संशाेधन कार्य करण्यावर भर राहणार असल्याचे डाॅ. वैद्य यांनी स्पष्ट केले.