राकेश कुमार : नदी स्वच्छतेसाठी ऊर्जा बचत करणारे तंत्रज्ञान वापरणे गरजेचेनागपूर : राज्यातील १० शहरे प्रदूषणमुक्त करण्याचे काम ‘नीरी’ने हाती घेतले आहे. नागपूरसमोर आज वायुप्रदूषणाची फारशी समस्या नसली तरी येत्या ३ ते ४ वर्षात नागपूरमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढणार आहे. शहर प्रदूषणमुक्त रहावे यासाठी ‘नीरी’ प्रयत्न करत आहे, अशी माहिती ‘नीरी’चे नवनियुक्त संचालक डॉ.राकेश कुमार यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मंगळवारी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला व आगामी कामाची रुपरेषा मांडली.गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. या मोहिमेसाठी ‘नीरी’तर्फे ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’चा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तांत्रिक व वैज्ञानिकदृष्ट्या गंगा नदी १०० टक्के स्वच्छ होऊ शकते. परंतु नदीमध्ये नाल्यांद्वारे येणारे सांडपाणी थांबविणे तसेच यंत्रणेची देखरेख हे सर्वात मोठे आव्हान आहे. नागनदीची स्थितीदेखील अशीच आहे. गंगा प्रकल्पावर ‘नीरी’ची ‘टीम’ काम करत असून ही ‘टीम’ गोमुख ते गंगासागरपर्यंतचा अभ्यास करणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. आतापर्यंतच्या पाहणीत अलाहाबाद, कानपूर, पटणा येथे गंगानदीत सर्वात जास्त प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याचे आढळून आल्याचेदेखील त्यांनी सांगितले. नदी स्वच्छता असो किंवा वायुप्रदूषण कमी करणारी यंत्रणा, ऊर्जाबचत करणारे तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)कार्यपद्धती बदलविण्यावर देणार भरसाधारणत: ‘नीरी’त विविध समस्यांवर संशोधन करून अहवाल तयार करुन देण्यात येतो. परंतु या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी झाली की नाही याबाबत कुठलाही पाठपुरावा करण्यात येत नाही. या कार्यप्रणालीत आता बदल करण्यात येऊन अभ्यासातील शिफारशींवर प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही यावर भर देण्यात येणार असल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.
नागपूरला प्रदूषणमुक्त करण्याचा ‘नीरी’चा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 2:40 AM