लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद(सीएसआयआर)अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था(नीरी)तर्फे कोरोना चाचणीसाठी नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. नीरीने शोधून काढलेल्या व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(आयसीएमआर)कडून परवानगी प्राप्त असलेल्या ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ या पद्धतीने कोरोना चाचणीची शनिवारी नागपुरात सुरुवात करण्यात आली.
नागपूर महापालिकेद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, जेरिल लॉन जवळील आरपीटीएस (पोलीस प्रशिक्षण केंद्र) येथे ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ या पद्धतीद्वारे नागरिकांची कोविड चाचणी सुरू करण्यात आली. या केंद्राला शनिवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. आयुक्तांनी नीरीचे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद(सीएसआयआर)अंतर्गत नीरीच्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसह एक नवा टप्पा गाठला आहे. ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाईल. हा नमुना नीरीच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविला जाईल. एका विशिष्ट तापमानात, नीरीकडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. तीन तासात त्याचा रिपोर्ट प्राप्त होतो. कृष्णा खैरनार यांनी या चाचणी पद्धतीचे संशोधन केले आहे. आरपीटीएसचे नोडल अधिकारी डॉ. मोरे हे आहेत.
खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोल्युशन गरम केल्यानंतर एका ‘आरएनए’ टेम्प्लेट तयार होते. त्यानंतर या सोल्युशनवर ‘आरटी-पीसीआर’ प्रक्रिया केली जाते. चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे खूप स्वस्त पडते. नाकातून स्वॅब घेण्यासाठी अधिक वेळ लागतो. तसेच या पद्धतीमध्ये नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.
नव्या पद्धतीमुळे आता हा त्रास त्यांना सहन करावा लागणार नाही व वेळही वाचेल. तसेच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असा विश्वासही खैरनार यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे म्हटले आहे. नीरीच्या या कामगिरीमुळे जागतिकस्तरावर येथील वैज्ञानिकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.