निशांत वानखेडे, नागपूर: सार्स काेविड-२ चे नवे व्हेरिएंट आणि इतर विषाणूंचा मागाेवा घेण्यासाठी जागतिक आराेग्य संघटना (डब्ल्यएचओ) ने जगभरातील प्रयाेगशाळांमध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) चीही निवड केली आहे. नीरीद्वारे स्थापित ‘काे.वि.नेट’ या प्रयाेगशाळेद्वारे विदर्भातील ११ जिल्ह्यात शहरातील सांडपाणी व रुग्णालयातील कचऱ्यावर संशाेधन केले जाईल.
नीरीच्या पर्यावरणीय महामारी विज्ञान आणि महामारी व्यवस्थापन (ईईपीएम) विभागाला सार्स-काेविड-२ चे गंभीर ठिकाणे ओळखण्यासाठी तसेच पर्यावरण आणि सांडपाणी सर्वेक्षणाचे ठेवण्याचे कौशल्य सामायिक करण्यासाठी डब्ल्यएचओतर्फे आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ कृष्णा खैरनार हे या विभागाचे प्रमुख व मुख्य शास्त्रज्ञ आहेत. ईईपीएम विभागाच्या प्रयाेगशाळेत विदर्भातील ११ जिल्ह्यामध्ये ‘इन्साकाॅग’ जीनाेम निरीक्षणाचे व काेविड संरक्षक म्हणून कार्य केले जाते. विभागाची प्रयाेगशाळा विदर्भात अनेक सरकारी रुग्णालयांशी व प्रयाेगशाळांशी जुळली असून सांडपाणी व निदानयुक्त नमुन्यांचे निरीक्षण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्जित आहे. प्रयाेगशाळेत मागील दाेन वर्षापासून काेविड पाॅझिटिव्ह नमुन्यांच्या जीनाेमचे निरीक्षण केले असून ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंझा डेटा (जीआयएसएआयडी) कडे ५००० हून अधिक नमुन्यांचा जीनाेम सिक्वेन्सिंग अहवाल सादर केला आहे.नीरीची ‘काेविनेट’ प्रयाेगशाळा काेविड-१९ महामारीच्या सुरुवातीच्या काळात स्थापन करण्यात आली हाेती. डबल्यएचओद्वारे या प्रयाेगशाळेची रचना सुधारण्यात येत असून ती जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमधून कार्य करेल.
सार्वजनिक आराेग्यासाठी महत्त्वाचे असल्याने नव्या काेराेना विषाणूचे जीनाेटायपिक व फिनाेटायपिक मूल्यांकन सुलभ करणे तसेच सार्स-काेविड-२, मर्स काेविड यांच्या क्षमतांचे अचूक शोध आणि निरीक्षण करणे हा यामागचा उद्देश असल्याचे नीरीतर्फे सांगण्यात आले आहे. ‘काेविनेट’ द्वारे अचूक निदान आणि वेळेवर जोखीम मूल्यांकनासह भविष्यातील सर्व प्रकारांचा मागोवा ठेवण्याचे डब्ल्यूएचओचे उद्दिष्ट आहे. साथीचा रोग कमी झाल्यामुळे, चाचणी मोठ्या प्रमाणावर होत नाही. म्हणून, जेव्हा आपल्याकडे अभ्यासासाठी जास्त नैदानिक नमुने नसतात, तेव्हा सांडपाणी निरीक्षण महत्त्वपूर्ण बनते. यामुळे रोगजनकांचा समुदाय प्रसार लवकर शोधण्यात मदत होईल, असे डॉ. खैरनार यांनी सांगितले. नवीन काेराेना व्हेरिएंटचे संशाेधन करण्यासाठी सांडपाणी निरीक्षण महत्त्वाचे असून डब्ल्यूएचओद्वारे भारतभर निरीक्षणासाठी तसेच प्रशिक्षण, क्षमता निर्माण आणि अधिक केंद्रे तयार स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.