योगेश पांडे
नागपूर : ‘नीट’ महाघोटाळ्यांचे धागेदोरे नागपुरात सापडल्यामुळे अगोदरच खळबळ उडाली असताना या ‘रॅकेट’मध्ये अभियांत्रिकी संस्थांच्या प्रवेशाचा गैरप्रकारदेखील सुरू होता का, यादृष्टीनेदेखील तपास सुरू आहे. सूत्रधार परिमल कोतपल्लीवारकडून आर. के. एज्युकेशन ॲण्ड करिअर गाइडन्सचा जो प्रचार-प्रसार करण्यात यायचा, त्यात वैद्यकीय प्रवेशासह अभियांत्रिकी संस्थांमध्येदेखील सहज प्रवेश मिळवून देण्याचा दावा करण्यात येत होता. ‘लोकमत’च्या हाती या संस्थेचे पत्रक लागले असून, त्यातून ही बाब उघड झाली आहे.
मुळात आर. के. एज्युकेशन ॲण्ड करिअर गाइडन्स हे ‘कोचिंग क्लास’ नव्हते तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत ‘अर्थ’पूर्ण मार्गदर्शन करण्यात येत होते. संस्थेतर्फे ‘सोशल मीडिया’वरदेखील प्रवेशासंदर्भात प्रचार-प्रसार करण्यात येत होता. बारावीनंतर करिअरचा मार्ग सापडावा, यासाठी ‘नीट’सह ‘जेईई’साठीदेखील विद्यार्थी अभ्यास करत असतात. मात्र, ‘एनआयटी’ व ‘आयआयटी’ येथे फारच कमी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थी व प्रामुख्याने पालकांमधील स्पर्धा लक्षात घेता त्याचा गैरफायदा घेतला जायचा.
संस्थेच्या पत्रकात ‘मोठमोठ्या एनआयटी, आयआयटीसह अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी आम्ही समुपदेशन करतो’ असे लिहिले असून, त्यात स्पष्टपणे ‘नीट’सह ‘जेईई’मध्येदेखील आमचे विद्यार्थी यश मिळवतात, असा उल्लेख आहे. संस्थेच्या संकेतस्थळावरदेखील अभियांत्रिकी प्रवेशाबाबत स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे.
निकालानंतर गर्दी‘लोकमत’ने परिमल कोतपल्लीवारच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. कार्यालय धाडी पडल्यापासून बंद आहे, परंतु तेथे बारावीचा निकाल लागल्यापासून विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढल्याची माहिती लोकांनी दिली. प्रवेशद्वारावर सीसीटीव्हीदेखील लावण्यात आले होते. वर्धा येथील एका विधवा महिलेने मुलासाठी पैसे दिले होते; परंतु तिची फसवणूक करण्यात आली. तिला अक्षरश: हाकलून लावण्यात आले होते.