निशांत वानखेडे
नागपूर : नॅशनल टेस्टींग एजेन्सी (एनटीए) ने राबविलेल्या वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेचा सावळा गाेंधळ संपण्याची चिन्हे नाहीत. या महाघाेटाळ्याचा माेठा फटका यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला बसला आहे. या मुलीला पहिल्या परीक्षेत ६४० गुण मिळाले हाेते व ऑल इंडिया रॅंक ११ हजारावर हाेती. मात्र दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नसताना नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण इतके घटले की ती थेट ११ लाख रॅंकवर फेकल्या गेली. यामुळे तिला व कुटुंबियांना माेठा मानसिक धक्का बसला आहे.
या मुलीचे नाव भूमिका राजेंद्र डांगे असे असून ती यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील रहिवासी आहे. तिचे वडील राजेंद्र डांगे हे सीआरपीएफचे सेवानिवृत्त सैनिक असून सध्या आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून सेवा देत आहेत. भूमिकाने मे महिन्यात नीटची परीक्षा दिली हाेती. ४ जून राेजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत भूमिकाला ७२० पैकी ६४० गुण प्राप्त झाले असून ९७.७९ ही तिची टक्केवारी आहे. तिचा ऑल इंडिया रॅंक ११,७६९ एवढा आहे.
दरम्यान नीट परीक्षेत माेठा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर एनटीएने ग्रेस गुण मिळालेल्या १५०० विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली. या परीक्षेशी भूमिकाचा काहीही संबंध नाही. तिने परीक्षाही दिली नाही. पुन:परीक्षेच्या निकालानंतर भूमिकाची गुणपत्रिका बदलून मिळाली तेव्हा तिच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला. नव्या गुणपत्रिकेत तिचे गुण ६४० वरून थेट १७२ वर खाली आले. तिची टक्केवारी घसरली आणि ११ हजाराच्या रॅंकवरून ती थेट ११,१५,८४५ व्या रॅंकवर फेकली गेली. वास्तविक पुन:परीक्षेनंतर या विद्यार्थ्यांची रॅंक वाढायला पाहिले व तसे झालेही आहे. मात्र भूमिकाच्या बाबत उलट घडले. तिची गुणपत्रिकाही बदलली आणि रॅंकही माेठ्या फरकाने घसरली. या नव्या निकालाने भूमिका व तिच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे.
"हा नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएचा महाघाेटाळाच म्हणता येईल. दुसऱ्यांदा परीक्षा न देता मुलीचे गुण कसे बदलले? तिची रॅंक वाढायला पाहिजे, ती घटली कशी? एनटीएने खराेखरच माेठा गाेंधळ घालून ठेवला असून यामुळे विद्यार्थी व पालकांचा विश्वास ढासळला आहे. या मुलीने एनटीएला न्यायालयात खेचावे."- नरेंद्र वानखेडे, नीट परीक्षा मार्गदर्शक
"नव्याने गुणपत्रिका आली तेव्हा आम्हाला माेठा धक्का बसला. माझ्या मुलीचे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न भंगले. याबाबत आम्ही एनटीएला ई-मेलही पाठविला पण त्याचे प्रत्युत्तर आले नाही. काय करावे कळेना झालेय."
- राजेंद्र डांगे, भूमिकाचे वडील