निशांत वानखेडेलाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या नीट परीक्षेवरून दिवसागणिक वेगवेगळे घाेळ समाेर येत आहेत. पुनर्परीक्षा न देता गुणपत्रिकेत बदल हाेण्याच्या प्रकरणानंतर रॅंकवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहेत. ६४० गुण घेणाऱ्या एका उमेदवाराला ११ हजारावी रॅंक दिली आहे, तर तेवढेच गुण घेणाऱ्या दुसऱ्याला ३९ हजारावी रॅंक देण्यात आली आहे. यावरून नॅशनल टेस्टींग एजेन्सी (एनटीए) ने काेणत्या आधारावर रॅंक दिली, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
यवतमाळच्या आर्णी येथील एका विद्यार्थिनीची गुणपत्रिकाच बदलली आहे. नीटच्या पहिल्या परीक्षेत तिला ६४० गुण हाेते. त्यानंतर ग्रेस गुणांच्या गाेंधळावरून १५०० च्यावर मुलांची पुनर्परीक्षा घेण्यात आली हाेती. या मुलीचा ग्रेस मार्क व पुनर्परीक्षेशी काही संबंध नाही, तिने दुसऱ्यांदा परीक्षाही दिली नाही. तरी पुनर्परीक्षेच्या निकालानंतर तिची गुणपत्रिका पूर्ण बदलली. तिचे गुण कमी झाले आणि रॅंकही ११ लाखांवर गेली. मात्र प्रश्न केवळ गुणपत्रिका बदलल्याचाच नाही.
पहिल्या गुणपत्रिकेत तिला ६४० गुण मिळाले आहेत. या गुणांवर तिची ऑल इंडिया रॅंक ११,७६९ दर्शविण्यात आली आहे. मात्र या गुणांवर रॅंक ११ हजारावर कशी असेल, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे नागपुरातील एका विद्यार्थ्याने स्वत:ची गुणपत्रिकाच लाेकमतकडे पाठविली. त्यालाही ६४० गुण आहेत पण त्याची रॅंक ३९,०८८ एवढी आहे, जी बराेबरही आहे. पण जर ही रॅंक बराेबर आहे तर यवतमाळच्या मुलीची रॅंक ११ हजारावर कशी, हा प्रश्नच आहे. यावरून एनटीएने कुठे कुठे, काेणत्या स्तरावर, कसे कसे घाेळ करून ठेवले आहेत, हेच दिसून येते. एनटीएने नीट परीक्षेचा खेळखंडाेबा केल्याचा आराेप मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तज्ज्ञांनी केला आहे.