लोकमत न्यूज नेटवर्कनागूपर : कोरोना विषाणूची लागण झालेला आणखी एक रुग्ण शनिवारी नागपुरात आढळून आला. हा रुग्ण दिल्लीहून आला असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे, गेल्या दोन दिवसात तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. हे सर्वच नमुने दिल्ली व मरकज प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या संशयितांचे असल्याची माहिती आहे.नागपुरात कोरोनाचे १६ बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे नमुने तपासण्यत आले. हे सर्व नमुने निगेटिव्ह आल्याने बाधितांची साखळी तुटली असे खुद्द डॉक्टर सांगत होते. ३१ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. उलट निगेटिव्ह नमुन्यांची संख्या वाढली होती. परंतु आज शनिवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह येताच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली. दरम्यान दिल्ली व मरकज प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या २०० वर संशयितांचे नमुने मेयो, मेडिकलने घेऊन मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले. परंतु मेयोच्या प्रयोगशाळेतील एक यंत्र बंद पडल्याने दुसऱ्या छोट्या यंत्रावर भार वाढला. याच दरम्यान ‘एम्स’मध्ये आज शनिवारपासून नमुने तपासण्याला सुरुवात झाली. मेयोमध्ये शुक्रवारी ३३ व आज नागपुरातील १५ असे एकूण ४८ तर एम्समध्ये २८ असे एकूण ७६ नमुने तपासण्यात आले. यातील एक पॉझिटिव्ह नमुना सोडल्यास उर्वरीत ७५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.भीती न बाळगता तपासणी कराआतापर्यंत ९२६ नमुने तपासण्यात आले असून ९०९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यामुळे लोकांनी भीती न बाळगता प्रतिबंधात्मक उपाय करा, ज्यांंना ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा गेल्या चार आठवड्यात मरकज किंवा दिल्ली प्रवासावरून आले असाल त्यांनी तातडीने मेयो, मेडिकलच्या ‘कोव्हीड-१९’या ओपीडीला भेट द्या, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
दिल्ली व मरकजहून आलेले ७५ नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 12:33 AM
गेल्या दोन दिवसात तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. हे सर्वच नमुने दिल्ली व मरकज प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या संशयितांचे असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देमेयोने तपासले ४८ : एम्सने तपासले २८ नमुने