नागपूर - मागील पाच वर्षांत मी १७ लाख कोटींच्या कामांचे वाटप केले आहे, तर या वर्षी कमीत कमी पाच लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. मात्र सरकारी मानसिकता घेऊन व नकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे लोक हीच मोठी समस्या आहे. निर्णय करण्याची प्रशासनातील लोकांची हिंमत नाही, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) हीरक महोत्सवी वर्षाचे रविवारी उद्घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. आपल्या देशात अनेक गोष्टींच्या कच्च्या मालाचे उत्पादन होत असतानादेखील ४० लाख कोटींच्या मालाची आयात करण्यात येते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आयात घडवून निर्यात वाढवावी लागेल, असे गडकरी म्हणाले. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ‘सिमेन्स सेंटर आॅफ एक्सेलन्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. यात १२ जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारण्यात येतील. विविध तांत्रिक महाविद्यालयांतील ५ ते १० हजार विद्यार्थ्यांना दर वर्षाला प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी दिली.
नकारात्मक सरकारी मानसिकता हीच समस्या - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:54 AM