लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानभवनाला शहराची शान मानले जाते. वर्षातून एकदा येथे विधानमंडळाचे अधिवेशन होत असते. राज्य सरकार येथून संपूर्ण राज्य चालवीत असते. परंतु या महत्त्वपूर्ण इमारतीची देखभाल वर्षभर होत नाही. आता विधानमंडळ सचिवालय कक्ष येथे सुरू करण्यात आला आहे. दोन महिने झाले परंतु तरीही या परिसरातील साफसफाईकडे कुणाचेही लक्ष नाही. याच्या वार्षिक देखभालीसाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवर निर्णय झालेला नाही. परिणामी परिसरात असवच्छता पसरलेली आहे.
विधिमंडळ सत्राशी जुळलेल्या इतर इमारती उदा. रविभवन, नागभवन, आमदार निवास यांची नियमितपणे देखभाल व्हावी, यासाठी साफसफाईचे वार्षिक कंत्राट दिले जाते. परंतु विधानभवनाची रंगरंगोटी केवळ अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसापूर्वीच केली जाते. अधिवेशनानंतर या इमारतीचा वापर होत नाही. त्यामुळे वार्षिक देखभालीची गरज नाही. परंतु आता तसे राहिले नाही. जानेवारीपासून येथे विधानमंडळ सचिवालय कक्ष सुरु झाले आहे. या कक्षाकडेच विधानभवनाच्या विस्ताराचाही जबाबदारी आहे. कक्ष सुरू झाल्यापासून येथे अधिकारी-कर्मचारी यांची दररोज ये-जा असते. सुरक्षेसाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. परंतु मूलभूत सुविधा मात्र नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही हात बांधले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, येथील देखभालीसाठी कर्मचारीच नियुक्त नाही. विभागाने वार्षिक देखभाल निविदेसाठी मंजुरी मागितली आहे, परंतु आतापर्यंत कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही.
५६ लाखाचा खर्च अपेक्षित
सार्वजनिक बांधकाम विभागाने विधानभवनाच्या देखभालीसाठी वर्षभरात ५६ लाख रुपयाचा खर्च येण्याची अंदाज धरून निविदा जारी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. याअंतर्गत दररोज साफसफाई, शौचालयाची सफाई आणि रंगरंगोटी आदी कामे करण्यात येईल.