मिहान ते सीताबर्डी हजारो ग्राहकांना फटका : अधिकारी मात्र गायब, सुमारे ५० लाखांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या निष्काळजीपणामुळे केबल उखडल्याने मंगळवारी दुपारी बीएसएनएलचे लँडलाईन, मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प पडली. याचा फटका मिहान ते सीताबर्डीपर्यंत हजारो ग्राहकांना बसला. बीएसएनएलद्वारे ड्रार्इंग सोपविल्यानंतरही ही घटना घडली. याचा फटका मिहानच्या अनेक मोठ्या कंपन्यांनाही बसला. रात्री उशिरापर्यंत बीएसएनएलचे अधिकारी सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत होते तर दुसरीकडे मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र गायब होते. मेट्रोच्या या निष्काळजीपणामुळे सुमारे ५० लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. झिरो माईलजवळ मेट्रोचे स्टेशन होणार आहे. यासाठी दुपारी २ च्या सुमारास बीएसएनएलच्या टेलिकॉम केबल डक्टच्या वरच बोरिंग मशीन लावण्यात आली. यामुळे जमिनीच्या सुमारे सहा फूट खाली असलेली फायबर आॅप्टिकल केबल आणि कॉपर वायर मशीनमुळे ओढत बाहेर आली. मेट्रोच्या मजुरांनी ते काढून एका कोपऱ्यात फेकून दिले. तिकडे एक्स्चेंज डॅमेज होताच मिहानपर्यंत फायबर आॅप्टिकलद्वारे चालणारी इंटरनेट सेवा बंद झाली. याशिवाय लॅन्डलाईनने चालणारे इंटरनेट कनेक्शन, लॅन्डलाइर्न फोन आणि मोबाईल सेवाही खंडित झाली. सुमारे २०० मीटरचे अंतर असलेले एक्स्चेंज बदलण्यासाठी बीएसएनएलची टीम संध्याकाळी ६ वाजता या ठिकाणी आली. दोन वर्षांआधी झाला सर्वे सूत्रांत्री दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामासाठी दोन वर्षांआधी या भागाचा सर्वे करण्यात आला होता. बीएसएनएलने वायर्स शिफ्ट करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये मेट्रोला मागितले होेते. मेट्रोने लाईनला डॅमेज न करण्याची हमी देत इतकी रक्कम देण्यास नकार दिला होता. याशिवाय दर महिन्यात अधिकाऱ्यांची बैठक होते ज्यात मेट्रोच्या कामाबाबत बीएसएनएलला सूचित केले जाते. सोमलवाड्यातही घडलाय असा प्रकार आठ दिवसांआधी असाच प्रकार सोमलवाड्यातही घडला. येथेही मेट्रोच्या कामासाठी बोरिंग मशीन लावण्यात आली. परंतु अधिकारी वेळेत पोहोचल्याने जास्त नुकसान झाले नाही. काही तासांच्या प्रयत्नाने येथील सेवा पूर्ववत झाली. उशीर लागण्याची शक्यता जिथे हे डॅमेज झाले आहे त्याच्याजवळ दोन्ही एक्स्चेंजला अस्थायी वायर्सद्वारे एक-दुसऱ्याशी जोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रक्रियेत फायबर आॅप्टिकल केबलला आधी जोडले जात आहे. कॉपर वायर्ससाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे रस्त्याच्या बाजूने डक्ट बनविले जात आहे. नंतर यात वायर्स टाकले जातील. समन्यवयाचा अभाव हा सर्व प्रकार मेट्रो आणि बीएसएनएलच्या समन्वयाअभावी घडलेला दिसत आहे. ज्यावेळी बोरिंग मशीन लावण्यात आली त्यादरम्यान बीएसएनएलचे अधिकारी-कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीच येथे मशीन लावण्यात आली.
‘मेट्रो’च्या निष्काळजीमुळे उखडले केबल; मोबाईल, इंटरनेट ठप्प
By admin | Published: May 10, 2017 2:25 AM