दोन वर्षात होणार होते काम पूर्ण, चार वर्षे लागण्याची शक्यता
लोकमत विशेष
वसीम कुरेशी
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नॅरोगेज रेल्वे इतिहासजमा झाली आहे. परंतु नॅरोगेज मोतीबाग वर्कशॉप कायम आहे. येथे ब्रॉडगेज कोचची देखभाल करावी लागणार आहे. त्यासाठी यास विस्तार देण्यात येत आहे. सोबतच वर्कशॉपचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. परंतु मोतीबाग वर्कशॉपमध्ये शेडचा विस्तार करण्याचे आणि त्याचे आधुनिकीकरण करणाऱ्या कंपनीकडून हे काम होताना दिसत नाही. अशा स्थितीत या कंपनीला कंत्राट का दिले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मोतीबागमध्ये नवे शेड करण्याच्या नावाखाली केवळ लोखंडाच्या ढाच्यावर टीनाचे शेड लावलेले आहे. येथे क्रेन व मशीनची व्यवस्था करण्यात आली नाही. २०१७ मध्ये एचवायटी कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंपनीला हे काम २०१९ मध्ये पूर्ण करावयाचे होते. परंतु आतापर्यंत हे काम ५० टक्केही पूर्ण झाले नाही. हे काम रेल्वेचा उपक्रम कॉम्फोव्ह (सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर मॉडर्नायझेशन ऑफ वर्कशॉप) च्या निगराणीखाली करण्यात येत आहे. परंतु या कामाची देखभाल होत नसल्याचे दिसत आहे. कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि दोन-चार कर्मचारीच येथे लॅपटॉपवर वेळ घालविताना दिसतात. कंपनीचे जबाबदार व्यक्ती साईटवर दिसत नाहीत. सध्या दपूम रेल्वे नागपूर विभागात नॅरोगेज रेल्वे रुळाचे संचालन बंद आहे. वर्कशॉपमध्ये मोठ्या रेल्वेगाड्यांच्या कोचची देखभाल करावी लागत आहे. परंतु अरुंद शेड व मर्यादित साधनसामुग्रीमध्ये वर्कशॉपमध्ये कोच व व्हीलची कामे करण्यात येत आहेत. मशीनने सुसज्ज नवे शेड तयार झाल्यास अधिक संख्येने ब्रॉडगेज कोचची देखभाल करणे शक्य होणार आहे.
...............