मो. रफींच्या गीतांचा नजराणा : मो. रफी फॉर अमिताभ बच्चननागपूर : आवाजाच्या दुनियेतला बादशहा म्हणून मोहम्मद रफींना संबोधले जाते. त्यांच्या आवाजाला मधाची गोडी होती. त्यामुळेच जगभरात त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत. रफीसाहेबांच्या जाण्याला ३४ वर्षाचा कालखंड झाला. मात्र, त्यांच्या अजरामर गीतांच्या माध्यमातून ते आजही आमच्यात आहेत. रफी साहेबांसारखा गायक कलावंत पुन्हा कधीही होणे नाही, अशी भावना ‘ न फनकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफी तु बडा याद आया’ या कार्यक्रमातून त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व डॉ. पिनाक दंदे फाऊंडेशनतर्फे ‘मो. रफी फॉर अमिताभ बच्चन’ या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन आज रात्री साई सभागृहात करण्यात आले होते. मो. रफींच्या काही अजरामर गीतांसोबतच अभिनय आणि आवाजाच्या क्षेत्रातील दिग्गजांच्या मैत्रीचे काही किस्से या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात गायक मोहम्मद सलीम यांनी ‘मदीने वाले से मेरा सलाम कहना...’ या गीताने केली. त्यानंतर सुनील वाघमारे, रचना खांडेकर, आकांक्षा देशमुख, वीणा उकुंडे यांनी एकाहून एक सरस गीतांचा नजराणा सादर केला. ‘ये कहा आ गये हम...’, ‘रिमझिम गिरे सावन...’, ‘ओ साथी रे...’, ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया...’, ‘पत्ता पत्ता बुटा बुटा...’, ‘अब तो है तुमसे...’ या गीतांचा रसिकांनी मनसोक्त आनंद घेतला अन् भरभरून दादही दिली. जेव्हा ‘न फनकार तुझसा तेरे बाद आया, मो. रफी तू बहोत याद आया’ हे गीत सादर झाले तेव्हा सभागृहातील वातावरण पुरते भारावले. रसिकांनी रफी साहेबांना अभिवादन केले. मो. रफी यांच्याबरोबरच अन्य दिग्गज गायकांची गीतेही या कार्यक्रमात सादर करण्यात आली. कार्यक्रमाची संकल्पना मो. सलीम व सुनील वाघमारे यांची होती. कार्यक्रमात गायकांना वाद्यांवर पवन मानवटकर, प्रशांत खडसे, नंदू गोहाणे, दीपक कांबळे, संदीप रामटेके, राजेश धामणकर, संजय गाडे यांनी साथसंगत केली. मो. रफी आणि अमिताभ बच्चन यांच्या आठवणींना श्वेता शेलगावकर यांनी आपल्या निवेदनातून उजाळा दिला. (प्रतिनिधी)
न फनकार तुझसा तेरे बाद आया...
By admin | Published: December 16, 2014 1:04 AM