लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपली साहित्यकृती ज्ञानपिठ पुरस्काराच्या लायकीची होती. तरीही लायकी नसताना भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. अलिकडे पुरस्कारही मॅनेज होत असून ज्ञानपिठाच्या पिठात आता किडे वळवळताहेत, अशी गंभीर टीका ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी केली.‘कब्रीतला समाधिस्थ’ या आपल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या. विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या अर्पण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाथे प्रकाशनचे प्रा. संजय नाथे होते. रेड स्वस्तिक संस्था मुंबईचे मुख्य प्रवर्तक टी. एस. भाल यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ज्येष्ठ कवियत्री आशा पांडे, प्रा. डॉ. कोमल ठाकरे प्रमुख पाहुणे होते.यावेळी बोलताना गायधनी पुढे म्हणाले, सामान्य कलाकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळत असेल तर काय म्हणावे ? आम्ही कवी फकीर वृत्तीचे आहेत. आत्मसन्मानाला नख लागू देत नाही. आपण आयुष्यभर हे व्रत जोपासले आहे. ४६ वर्षांनंतर त्यांच्या या पुस्तकाच्या दुसºया आवृत्तीचे प्रकाशन पार पडले. १९७३ मध्ये या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाची आठवण त्यांनी करून दिली. ते म्हणाले, कवीचा आत्मसन्मान मोठा असतो. तो आपण सदैव जोपासला. कवीला इगो असावाच, मात्र तो सुंदर असावा, तोच कवीला प्रेरित करीत असतो. इगो सुंदर असेल तर ताजमहाल बनतो, अन्यथा बीबी का मकबरा बनतो.नवकवितेचा काळ आला तेव्हा अनेकांनी नाक मुरडले. मात्र त्यातूनच आठ खंडाचे आणि २६० पृष्ठांचे ‘योगिनींच्या स्वप्नसावल्या’ महाकाव्य जन्मास आले. आपल्या आयुष्यातील पडत्या काळात लोकमतच्या ‘नेमबाजी’ या सदराने तारले, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.यावेळी बोलताना टी. एस. भाल म्हणाले, सुधाकर गायधनी यांच्या आयुष्याचा आलेख खडतर आहे. आपली जुनी ओळख कुठेही न लपविता आणि आपल्या वाट्याला आलेल्या वेदना परखडपणे व स्पष्टपणे मांडून त्यांनी साहित्याची साधना केली. आपण आधीपासूनच त्यांचे वाचक आहोत. वाचकांचा एक प्रतिनिधी म्हणून प्रकाशनाची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.डॉ. कोमल ठाकरे म्हणाले, प्रज्ञापकड मजबूत असणारा कवीच वाचकाला जाणिवेतून नेणिवेकडे नेऊ शकतो. ही किमया साधण्याचे सामर्थ्य गायधनींच्या कवितेमध्ये आहे, म्हणूनच ४६ वर्षांनंतरही त्यांच्या कविता ताज्या वाटतात. आयुष्याच्या २४ व्या वर्षी लिहिलेले हे काव्य त्यांच्या काव्यप्रतिभेचा आरंभ होता. आपल्या काव्यातून सामाजिक जाणिवा मांडणारे ते प्रातिनिधिक कवी ठरतात. त्यांच्या सशक्त काव्यप्रतिभेमुळे मराठी साहित्याचे दालन समृद्ध झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आशा पांडे म्हणाल्या, त्यांच्या कविता अस्वस्थतेच्या निदर्शक आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी गायधनी यांनी उत्कटावस्थेतून लिहिलेल्या काव्याने नवा विचार दिला.नाथे प्रकाशनचे प्रा. संजय नाथे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. गायधनी यांनी भविष्यात वीररसपूर्ण काव्यनिर्मिती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रारंभी सुधाकर कऱ्हाळे यांनी प्रस्तावनेवर आणि गायधनी यांच्या साहित्यकार्यावर प्रकाश टाकला. संचालन प्रेमा लेकुरवाळे यांनी तर आभार उद्धव साबळे यांनी मानले. यवतमाळचे सुनील भेले यांनी पोस्टर पोएट्रीने सभागृहाचे दालन सजविले होते. यावेळी अनेकांनी गायधनी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपण पद्मश्री नाकारलासुधाकर गायधनी म्हणाले, आपणास मद्मश्री पुरस्कार देऊ करण्यात आला होता. मात्र आपण तो नाकारला. द्यायचाच असेल तर आपल्या लायकीनुसार पद्मभूषण द्या, अशी मागणी केली. अखेर तो पुरस्कार मंगेश पाडगावकरांना दिल्याचे दोन दिवसांनी कळले. पुरस्कारासाठी कटोरे घेऊन आपण कधीच रांगेत राहीलो, नाही. नेहमी आत्मसन्मानच जोपासला.
नेमांडेंचे पुस्तक ज्ञानपीठ पुरस्काराच्या लायकीचे नाही : सुधाकर गायधनींची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:04 PM
आपली साहित्यकृती ज्ञानपिठ पुरस्काराच्या लायकीची होती. तरीही लायकी नसताना भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. अलिकडे पुरस्कारही मॅनेज होत असून ज्ञानपिठाच्या पिठात आता किडे वळवळताहेत, अशी गंभीर टीका ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी केली.
ठळक मुद्दे पुस्तक प्रकाशन समारंभात व्यक्त झाली खदखद