लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : मामेबहिणीसाेबत लग्न लावून देण्यास मामाचा विराेध असल्याने चिडलेल्या भाच्यांची त्यांच्या दाेन मित्रांच्या मदतीने मामाचा झाेपेत खून केला. यात आराेपींनी त्याच्या छाती व डाेक्यावर टिकासने वार केले. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाकबंगला) येथे बुधवारी (दि. ९) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. यात पाेलिसांनी चाैघांपैकी तिघांना अटक केली.
संताेष गाेकुलनाथ साेलंकी (वय ५२, रा. पिपळा डाकबंगला, ता. सावनेर) असे मृताचे, तर जयपाल चव्हाण (२१), पवन चव्हाण (२३, दाेघेही रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर), धीरज ऊर्फ दिनेश धुर्वे (रा. हरदाेली) व मनीष बनारसे (रा. हरदाेली) अशी आराेपींची नावे आहेत. जयपाल व पवन संताेषचे भाचे असून, मनीष व धीरज पवनचे मित्र आहेत. संताेष बांधकाम कामगार म्हणून काम करायचा. धापेवाडा येथे त्याची बहीण राहत असल्याने काैटुंबिक वादामुळे त्याची पत्नी दाेन मुली व मुलाला घेऊन काही दिवसांपूर्वी धापेवाडा येथे राहायला गेली. त्यामुळे संताेष घरी एकटाच हाेता. कावीळने आजारी असल्याने त्याच्या घरी गावठी उपचार करणाऱ्यांची ये-जा हाेती.
दरम्यान, गुरुवारी सकाळी उपचार करणाऱ्यांपैकी एकजण त्याच्या घरी गेला असता, त्याचा खून करण्यात आल्याचे उघड झाले. माहिती मिळताच ठाणेदार काळे यांनी घटनास्थळ गाठले. छाती व डाेक्यावर टिकासने वार करून झाेपेतच त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले हाेते. पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माखनीकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान व स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली.
पाेलिसांनी सायंकाळी जयपाल, पवन व धीरजला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पाेलिसांनी दिली. मनीष पसार असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारवाई ठाणेदार काळे, उपनिरीक्षक अभिषेक अंधारे, उमेश ठाकरे, आशिष भुरे, प्रमोद भोयर, नुमान शेख, अलीम शेख, राजू भोयर यांच्या पथकाने केली.
...
लग्नावरून वाद
संताेषला १८ वर्षांची मुलगी आहे. भाच्यांपैकी एकाची त्याच्या एका मुलीसाेबत लग्न करण्याची इच्छा हाेती. मात्र, संताेषचा लग्नाला विराेध हाेता. त्यामुळे दाेघांच्याही मनात मामाविषयी राग हाेता. याच रागामुळे त्यांनी धीरज व मनीष यांना साेबत घेऊन धापेवाडा येथून माेटारसायकलने पिपळा (डाकबंगला) गाठले. दार आतून बंद असल्याने त्यांनी भिंतीची वीट काढली व हात आत टाकून दाराची कडी उघडली.
....
माेबाईलमुळे बिंग फुटले
खून केल्यानंतर आराेपींनी मनीषच्या माेटारसायकलने पळ काढला. जाताना त्यांनी संताेषचा माेबाईल साेबत नेला. हा माेबाईल बंद करून धापेवाडा शिवारात फेकला. पाेलिसांनी सर्वप्रथम संताेषच्या माेबाईलचे लाेकेशन ट्रेस केले. त्याचे शेवटचे धापेवाडा आढळून येताच पाेलिसांनी चाैकशी केली आणि त्याच्या पत्नीसह नातेवाइकांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले. त्यातच जयपाल व पवनने खून केल्याचे कबुल केले व मित्रांची नावे सांगितली.