लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये चाैघांना अटक केली. त्यात एका विधिसंषर्घग्रस्त बालकाचा समावेश आहे. ते चाैघेही अट्टल चाेरटे असून, त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे चाेरून नेलेले विविध साहित्य जप्त केले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि.१) रात्री करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये मोहम्मद शहबाज मोहम्मद सलीम ऊर्फ घुंगरू (२९, रा. कुंभारे कॉलनी, कामठी), इरफान सय्यद रुस्तम (२०, रा. आनंदनगर, कामठी) व मुन्ना ऊर्फ जिया खान नसरुल्लाह खान (२८, रा. नया बाजार, कामठी) या तिघांसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान, रामटेक परिसरात गस्तीवर असताना त्यांना हे चाैघेही एमएच-४९/एआर-३०७९ क्रमांकाच्या ऑटाेने संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी चाैघांनाही थांबवून विचारपूस केली. त्यावर त्यांनी आपण कामठी येथील रहिवासी असल्याचे पाेलिसांना सांगितले. मात्र, घुंगरू अट्टल चाेर असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांना आधीच माहिती असल्याने त्यांनी लगेच चाैघांनाही ताब्यात घेत चाैकशीला सुरुवात केली.
यात त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा ऑटाे, २० हजार रुपयांचे दाेन टीव्ही, १० हजार रुपयांचा माेबाईल, पाच हजार रुपये राेख व चार हजार रुपयांचे दाेन घरगुती गॅस सिलिंडर असा एकूण १ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली असून, या चाेरट्यांकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, पोलीस हवालदार नाना राऊत, नीलेश बर्वे, दिनेश आधापुरे, राजेंद्र रेवतकर, शैलेश यादव, विपीन गायधने, रोहन डाखोरे, अमोल वाघ, बालाजी साखरे, महेश बिसने, अमोल कुथे व सायबर सेलचे सतीश राठोड यांच्या पथकाने केली.
...
आठ पाेलीस ठाण्यात गुन्ह्यांची नाेंद
अटक करण्यात आलेल्या या चाेरट्यांविरुद्ध नागपूर ग्रामीणमधील रामटेक, कन्हान (ता. पारशिवनी), कळमेश्वर, सावनेर, माैदा, देवलापार (ता. रामटेक), काटाेल व बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) या आठ पाेलीस ठाण्यांमध्ये भादंवि ४५४, ४५७, ३८०, ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. हे सर्व गुन्हे २०२१ मधील आहेत. या चाैघांनी सावनेर व बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत दाेनदा तर उर्वरित सहा पाेलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एकदा चाेरी केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.