नागपूर - नेटवर्क टॉवरचे तांत्रिक साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ई-सर्व्हेलन्सच्या आधारे अटक केली. मात्र तपासादरम्यान चोरट्यांनी केवळ हीच नव्हे तर शहरात तब्बल १७ चोऱ्या केल्याची बाब समोर आली. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
२९ सप्टेंबर रोजी लॉ कॉलेज चौकातील एनजीपीआर टॉवरवरून फाईव्हजी बीबीयू कन्व्हर्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. यासंदर्भात सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून संशयितांवर पाळत ठेवली. यात संजीवकुमार अमान दोहेरे (२८, चिना, सेवडा, दतिया) व अजय रामप्यारे मौर्य (ओंकारनगर, गजाननगर) हे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना मेडिकल चौक परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित चोरीची कबुली दिली.
पोलीस कोठडीदरम्यान त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी अजनी, हुडकेश्वर, अंबाझरी, गिट्टीखदान, सक्करदरा, बजाजनगर, वाडी, काटोल, कळमेश्वर, कुही व मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारच्या १७ चोरी केल्याची बाब कबूल केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेले युनिट व मोटारसायकल जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक विजय नेमाडे, प्रफुल्ल मानकर, प्रीतम यादव, विक्रमसिंह ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.