नागपूर : पी.एफ.ची रक्कम वेळेवर देण्यात येत नाही, स्लिप देण्यात येत नाही असे आरोप ब्लॅक कॅट सेक्युरिटी टास्क अॅन्ड अलाईड सर्व्हिसेसच्या सुरक्षा रक्षकांनी केला होता. त्यावर व्यवस्थापकाने हे आरोप फेटाळत सुरक्षा रक्षक कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे पुरावे सादर केले.ब्लॅक कॅट सेक्युरिटीतील काही सुरक्षा रक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यात त्यांनी मासिक वेतन वेळेवर देण्यात येत नाही, पी.एफ.ची रक्कम वेळेवर जमा करण्यात येत नाही, सुरक्षेची साधने पुरविली जात नाही आदी आरोप या ब्लॅक सेक्युरिटीवर केले. त्याबाबत सेक्युरिटीचे व्यवस्थापक संजीवकुमार अग्रवाल यांनी पी.एफ.ची रक्कम आॅनलाईन जमा करण्यात येत असल्याचे पुरावे सादर केले. सुरक्षा रक्षकांना वेळेवर पगार देण्यात येतो. बोनससुद्धा त्यांनी केलेल्या कामानुसार देण्यात येतो. आमच्याकडून सुरक्षेची साधने सुरक्षा रक्षकांना दिली जातात. मोफत युनिफॉर्म, काठी, टॉर्च आदी पुरविले जातात. यापेक्षा आम्ही आणखी काय द्यावे, असा प्रश्न अग्रवाल यांनी उपस्थित केला. काही सुरक्षा रक्षकांनी काही दिवसांपूर्वी रोजंदारी मजदूर सेनेचे सदस्यत्व घेतले. तेव्हापासून ते कामात हलगर्जीपणा करीत आहेत. अमित भगत हा कर्तव्यावर असताना १३ डिसेंबर रोजी कामाच्या ठिकाणी झोपत होता. मोहन टापरे याने कारची चावी आणून तो त्यात झोपला होता. राहुल बागडे हा सुद्धा कामात कुचराई करीत असल्याचे आढळले. त्याबाबतचे आपल्याकडे पुरावे म्हणून छायाचित्र आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सुरक्षा रक्षकांचा कामात हलगर्जीपणा
By admin | Published: December 18, 2014 2:39 AM