मंगेश व्यवहारे
नागपूर : गांधी कधीच संपणार नाहीत, असे दावे केले जात असले तरी तंत्रज्ञानाच्या युगात गांधी नावाची ही आख्यायिका विस्मरणात जावी, अशीच आजची स्थिती आहे. नव्या पिढीला गांधीजींचे नाव माहिती असेल तरी त्यांच्या कर्तृत्वाची सर्वंकष जाणीव आज दिसत नाही. अशा तरुणाईला गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि बंधुभाव या त्रिसूत्रीच्या आधारे प्रगतीचे नवे दालन उघडण्याचा मार्ग दाखविता यावा, प्रचंड आत्मकेंद्रित असणाऱ्या आजच्या तरुणाईला समाजाभिमुखतेचा मंत्र देता यावा, यासाठी एका ध्येयवेड्या तरुणाने गांधींचाच आधार घेतला आहे. पण नुसता गांधी सांगून तो कळणार नाही हे या तरुणाला चांगले माहिती आहे. म्हणून त्याने गांधींच्या प्रतीकांना समाजजागृतीचे शस्त्र बनविले आहे. ( Mahatma Gandhi)
त्या प्रतीकांमध्ये जशी गांधी विचारांची पुस्तके आहेत तसेच गांधीजींच्या संघर्षाने भारलेला जीवनप्रवासदेखील आहे. हा जीवनप्रवास अतिशय रंजकतेने त्याने मांडला आणि जोपासला आहे. कपिल धनराज बन्सोड असे या युवकाचे नाव आहे. कपिल हा एक संग्राहक आहे. पण त्याच्या संग्रहाची थीम महात्मा गांधी आहे. त्याच्या या संग्रहाच्या थीममध्ये गांधी ५० पैशांच्या नाण्यात, पोस्टाच्या स्टॅम्पमध्ये, गांधीजींच्या ओरिजनल दुर्मीळ छायाचित्रांमध्ये, गांधीजींच्या हस्ताक्षरात, डाक विभागाच्या हवाईपत्रात, आकाशातील गांधी नावाचा तारा, गांधींच्या थॉटमध्ये आणि त्याच्या बोलण्यातसुद्धा.
संग्रहातील गांधीजींच्या थीम
१) महात्मा गांधींवरील देश-विदेशातील नाणी.
२) गांधींवरील विदेशातील पोस्टल स्टॅम्प.
३) गांधीजींच्या १५०व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय डाक विभागाने व विविध देशांच्या डाक विभागाने काढलेले फर्स्ट डे कव्हर.
४) महात्मा गांधींच्या हस्ताक्षरातील फर्स्ट डे कव्हर.
५) १००व्या जन्मशताब्दी वर्षाला भारतीय डाक विभागाने काढलेली मिनिचर शीट, हवाईपत्र, आंतरदेेशीय पत्र व पोस्ट कार्ड.
६) महात्मा गांधींचे दुर्मीळ छायाचित्र.
७) गांधी विचारांची प्रेरणादायी पुस्तके.
- गांधीजींच्या जीवन प्रवासातील घटनानिहाय तारखेच्या नोटा.
महात्मा गांधींचा जन्म, त्यांचा शाळेचा पहिला दिवस, त्यांना दक्षिण आफ्रिकेत रेल्वे डब्यातून बाहेर काढले तो दिवस, ते भारतात परत आल्याचा दिवस अशा गांधीजींच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांचा दिवस, महिना आणि वर्षनिहाय तारखा असलेल्या नोट कपिलच्या संग्रहात आहेत. हे त्याचा संग्रहाचे वेगळं वैशिष्ट्य आहे.
- कॉलेजमध्ये असतानापासून गांधीजींच्या साहित्याचा संग्रह करतोय. गांधीजींचे कर्तृत्व अफाट आहे, जगाने त्यांच्या कर्तृत्वाचा सलाम केला आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या काही साहित्याचा ठेवा माझ्याकडे आहे याचा आनंद आहे.
-कपिल बन्सोड, संग्राहक