नागपूर : राज्यात १९ पैकी १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत कायम अधिष्ठाता नाही. गुरुवारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यातील १० महाविद्यालयांत सेवाज्येष्ठता यादीनुसार नव्या लोकांना पुन्हा अतिरिक्त अधिष्ठातापदाची जबाबदारी दिली. नागपुरातील मेयोच्या अतिरिक्त अधिष्ठात्याचा भार डॉ. भावना सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला.
सेवाज्येष्ठता यादीला डावलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अतिरिक्त अधिष्ठातापद देण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. आज नाही तर उद्या हे अधिष्ठातापद जाणार असल्याने तात्पुरता निर्णय घेऊन वेळ मारून नेण्याचे प्रकार वाढले होते. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे बोट दाखविले जात असल्याने प्रलंबित प्रकरणे वाढली होती. अखेर प्राध्यापकपदाच्या एकत्रित सेवाज्येष्ठता यादीनुसार अधिष्ठाता या संवर्गातील पदोन्नतीसाठी विचारक्षेत्रात समाविष्ठ असलेल्या अध्यापकांना पदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्यास त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव येण्याच्या दृष्टीने अशा प्राध्यापकांना अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यावर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सेवाज्येष्ठाता यादीनुसार वरिष्ठ डॉक्टरांकडे अतिरिक्त अधिष्ठातापदाची जबाबदारी दिली. यात पुण्याचा बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. विनायक काळे, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. महेंद्र कुरा, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मुकुंद तायडे, जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मिलिंद फुलपाटील, उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. भालचंद्र मुहार, कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. प्रदीप दीक्षित, अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. भास्कर खैरे यांचा समावेश आहे.
-विदर्भातील तीन मेडिकलमध्ये बदल
विदर्भातील यवतमाळ, गोंदिया व चंद्रपूर मेडिकलमध्ये बदल करण्यात आले. यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिरिक्त अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ. एन. बी. कांबळे यांच्याकडे होता, नव्या आदेशानुसार या पदाची जबाबदारी डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे देण्यात आली. तसेच चंद्रपूर मेडिकलमधील डॉ. अविनाश टेकाडे यांच्याकडून नागपूर मेडिकलच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक नितनवरे यांच्याकडे सोपविण्यात आले तर, गोंदिया मेडिकलमधील डॉ. एन. जी. तिरपुडे यांच्या जागेवर डॉ. अपूर्व पावडे यांची वर्णी लावण्यात आली.